ईदी अमीन हा एक सनकी आणि भारतीयांचा तिरस्कार करणारा हुकूमशहा युगांडामध्ये १९७१ ला सत्तेवर आला होता. हा हुकूमशहा अतिशय क्रूर होता. ईदी अमीनची राजवट संपल्यानंतर युगांडामध्ये अनेक ठिकाणी लोकांचे मृतदेह कुजताना आढळून आले. सर्व सामूहिक कबरी उघडण्यात आल्या त्यातून जे सत्य बाहेर आलं ते भयानक होतं. तो खरोखर एक राक्षस होता, ज्याने आपल्याच देशातील लाखो लोकांना मारले होते. असं म्हणतात कि ईदी अमीनला माणसांचे रक्त प्यायला आवडायचं. हे शक्य पण होतं कारण तो ज्या समुदायातून होता त्यामध्ये मेलेल्या माणसाचे रक्त पिण्याची परंपरा होती. त्याचा भारतीय आणि आशिया खंडातील लोकांबद्दल विशेष राग होता आणि यामुळेच त्याने असा निर्णय घेतला ज्यामुळे लाखो लोकांना घर सोडावं लागलं.
ईदी अमीन सत्तेवर येण्यापूर्वी युगांडामध्ये आशियाई वंशाच्या विशेषतः भारतीय लोकांचे वर्चस्व होते. देशातील जवळपास प्रत्येक सिनेमागृहात हिंदी चित्रपट चालत होते. १९७० च्या दशकात युगांडाची राजधानी कंपालातील बहुतेक व्यवसाय आशियाई वंशाच्या लोकांच्या हातात होते. तेथील रस्त्यांनाही आशियाई वंशाच्या लोकांची नावे देण्यात आली होती. एकूणच युगांडाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात भारतीयांचा मोठा वाटा होता.
१९७१ मध्ये ईदी अमीनने सत्तापालट केल्यानंतर युगांडातील परिस्थिती पूर्णपणे बदलली. ईदी अमीनने सैन्याच्या मदतीने संपूर्ण देश ताब्यात घेतला. काही दिवस सर्वकाही ठीक होते, पण एके दिवशी अचानक ईदी अमीनने भारतीयांसह आशियाई वंशाच्या सर्व लोकांना देश सोडण्याचा आदेश दिला. यामागे त्याने तर्क केला की अल्लाहने त्याला सर्व आशियाई लोकांना आपल्या देशातून ताबडतोब हाकलून देण्यास सांगितले. असा विचित्र पद्धतीने ईदी काही पण निर्णय घ्यायला लागला. अमीनने १९७२ मध्ये आदेश दिले की, ज्या आशियाई लोकांकडे युगांडा देशाची नागरिकता नाही त्यांनी देश सोडून जावे. यानंतर सुमारे ६० हजार भारतीय आणि पाकिस्तानी लोकांना देश सोडावा लागला होता. देशातील कर्मचाऱ्यांत आशियाई लोकांचा मोठा वाटा होता. या लोकांनी देश सोडताच तेथील अर्थव्यवस्था कोलमडली होती. काही दिवसातच लोकांना ईदीच्या चंचल आणि उथळ निर्णयाचा तोटा जाणवायला लागला.
१९७९ मध्ये जेव्हा टांझानिया आणि अमीन विरोधी युगांडा लष्कराने त्याच्याविरोधात आवाज उठवला तेव्हा अमीनची आठ वर्षाची हुकुमशाही सत्ता संपुष्टात आली. अखेर अमीनला शरण यावे लागले आणि ११ एप्रिल १९७९ रोजी युगांडा सोडून पळून जावे लागले. यानंतर दोन दिवसातच पूर्वीच्या सरकारने सत्ता ताब्यात घेतली. त्याआधी ऑक्टोबर १९७८ मध्ये अमीनने टांझानियावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता जो अयशस्वी झाला होता. अमीनने देश सोडल्यानंतर तो काही काळ लिबियात शरण आला. नंतर तो सौदी अरबमध्ये स्थायिक झाला. २००३ मध्ये त्याचा मृत्यू झाला.
ईदी अमीनचा बहुपत्नीत्वावर विश्वास होता आणि किमान सहा स्त्रियांशी त्याने लग्न केले होते. त्यापैकी तीन स्त्रियांशी त्याने नंतर घटस्फोट घेतला. अमीनला नेमकी किती मुले होती हे कोणालाच माहीत नाही, परंतु बहुतेकांचे म्हणणे आहे की त्याला ४०-४५ मुले होती.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?