MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

अल्ला हू अकबर, जय श्री रामच्या नाऱ्यांमुळे कर्नाटकाच्या शाळा बंद कराव्या लागल्यात.

hindu muslim karntaka controversy

एकदम विषयाला हात घालायच्या आधी तुम्हाला माझा एक किस्सा सांगतो, ” २००७ -२००८ ला गावातल्या जिल्हा परिषेदेच्या शाळेत चौथीच्या वर्गात होतो. माझ्या वर्गात मोजून ३० पोर पोरी होती. त्यात आम्ही पोर फक्त बारा. आमच्या बारा पैकी फक्त दोन दलित होते. तर झालं असं, गावात एकदम कट्टर वातावरण होत वैगेरे असं काही नाही पण आम्ही पोर आपण कोण आहोत याचा शोध घ्यायचो. म्हणजे आमची जात कुठली ? आमचा धर्म कुठला वैगेरे वैगेरे …तश्या गप्पा पण आमच्या कानावर यायच्या. नकळत आम्हाला कळालं कि आपण मराठा आहोत. आपले दैवत देव वैगेरे आहेत. आपण कुठल्या जातीचे आहोत कळण्यासोबत आम्हाला हे पण कळलं कि आमचे दोन दलित मित्र आपल्या जातीचे नाहीत. मग कळलं कि बाबासाहेब आंबेडकर त्यांचे देव वैगेरे आहेत. त्या वेळी चौथीच्या वर्गाला डॉ आंबेडकरांचा धडा होता. मला आठवत नाही त्यावेळी काय झालं होत. पण एकेदिवशी माझ्या वर्गातले आम्ही दहाही जण मराठीच्या पुस्तकात असलेल्या बाबासाहेबांचा फोटो खोडून टाकत होतो. सर्वानी जवळ जवळ खोडून काढला. आमच्या दलित वर्ग मित्रांना चिडवण्यासाठी बाबासाहेंबांचा फोटो आम्ही खोडून काढला होता. माहित नाही आमच्या सरला ही खबर कुठून कळली. महेश जाधव आमचे सर होते. सर वर्गात आले पुढच्या बँचवर मी बसलो होतो. सरांनी मराठीच पुस्तक मागितलं. आपण केलेल्या कृत्याची जाणीव होती त्यामुळे मी पुस्तक देत नव्हतो. पण सरांनी मागितल्यामुळे देण्याशिवाय पर्याय नव्हता. पुढे काय झालं असेल याचा अंदाज तुम्हाला आला असेल. सरांनी माझा प्रताप बघितला. मला चांगलं आठवतंय माझ्या गालावर कमीत दहा पंधरा ठोके पडले. सर्व पोरांच्या वतीने मी एकट्याने मार खाल्ला. सरांनी फार समजावून सांगितल्याचं आठवत नाही पण पुन्हा कधी द्वेषाची भावना मनात आल्याचं आठवत नाही.”

कर्नाटकाच्या सर्व घटना पहिल्या अन लगेच माझा किस्सा आठवला. लहान पोरांच्या डोक्यात खूप पद्धतशीरपणे जात धर्म घुसवला जातो. त्याचा वापर ते त्यांच्या फायद्यासाठी करतात. हे राहू देतो हे लई डिप होतंय, कर्नाटक मध्ये नेमकं काय झालय ते बघू …

ड्रेस कोडचे पालन न केल्याने मुस्लिम विद्यार्थिनीना प्रवेश नाकारला.

कर्नाटकच्या उडपी जिल्ह्यातली घटना आहे. कोरोनाची बंधने कमी झाल्यावर महाविद्यालये सुरु झाली. पोर पोरी कॉलेजात येऊ लागली पण समस्या अशी झाली. काही मुस्लिम विद्यार्थिनी मुस्लिम घालतात त्यो हिजाब वेष परिधान करून महाविद्यालयांत येत होत्या. महाविद्यालयाला ड्रेस कोड असल्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने त्यांना हिजाब न घालून येण्याची सूचना केली. मुस्लिम विद्यार्थिनीनी प्रशासनाची सूचना धुडकवल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांना महाविद्यालयात प्रवेश नाकारला. तिथूनच सगळया प्रकरणाला सुरुवात झाली.

मुस्लिम विद्यार्थिनींवर अन्याय होत असल्यामुळे काही जण कोर्टात गेले.

कॉलेजचे प्रशासन आणि विद्यार्थिनी यांच्यातला वाद मिटला नाही. त्यामुळे त्याला राजकीय रंग देण्यासाठी काही जण कॉलेजात येऊन गेले. कॉलेज प्रशासन त्यांच्या दबावाला बळी पडत नाही दिसल्यावर त्यांनी विद्यार्थिनीना घेऊन आंदोलन वैगेरे केले. मुस्लिम मुलींनी कुठला ड्रेस परिधान करावा त्यांचा अधिकार असल्याचे त्यांचे मत होते तर कॉलेज प्रशासन त्यांची मागणी मान्य करत नव्हता. प्रश्न तिथे सूटत नाही म्हंटल्यावर कर्नाटक कोर्टाचा दरवाजा खटकावला गेला. जो प्रश्न आपसात चर्चा करून संपवता आला असता प्रशासन आणि विद्यार्थिनीच्या हटवादी भूमिकेमुळे कोर्टापर्यंत पर्यंत गेलाय.

भगवे उपरणे घालून हिंदू विद्यार्थिनींनी पण वादात उडी घेतली आहे.

हा ड्रेस कोडचा मामला कोर्टात गेल्यामुळे सर्व राज्यभर याची चर्चा झाली. मुस्लिम विद्यार्थिनी कॉलेजचा ड्रेस कोड नाकारत असल्याचा प्रचार झाला. आता अश्या नाजूक ठिकाणी स्वतःची पोळी भाजणारे लोक येणार नाहीत असं होईल का ? ते लोक बरोबर महाविद्यालयाच्या परिसरात आले. मुस्लिम मुली त्यांच्या धर्मासाठी हे करत आहे असा त्यांनी प्रचार केला. साहजिकच हिंदू विद्यार्थी यांच्या प्रचाराला बळी पडले. आपला धर्म धोक्यात असल्याचं त्यांना वाटायला लागलं. हिजाबचा बदला आपण भगवे उपरणे परिधान घालून देऊ असे त्यांनी ठरवले. ६ फेब्रुवारीला कॉलेजात हिंदू विद्यार्थिनी भगवे उपरणे परिधान करून आल्या. एका बाजूला हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थिनी तर दुसरी कडे भगवे उपरणे परिधान केलेल्या विद्यार्थिनी. वातावरण प्रचंड नाजूक झालं होत.

सरकारने तीन दिवस शाळा कॉलेज बंद केले खरे पण प्रश्न जटिल झालाय.

समाजकंटक प्रकरणाला हिंदू मुस्लिम रंग देण्यात यशस्वी झालेत. कॉलेज मध्ये विद्यार्थिनी एकमेकांसमोर आल्यावर अल्ला हू अकबर आणि जय श्री रामचे नारे देत होत्या. एक नागरिक म्हणून हा सर्व प्रकार बघून प्रचंड वेदना होतात. हे तुम्ही पण मान्य कराल. ह्या सर्व प्रकाराचे लोन राज्यभर पसरू नये म्हणून कर्नाटक राज्यसरकारने ९, १०, ११ फ्रेब्रुवारी हे तीन दिवस शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर केलीय.

सरकारने काळजी पोटी सुट्टी जाहीर केली. तेवढ्या वेळात त्यांना सुधारणा करायला वेळ देखील मिळेल. पण हा प्रश्न खूप जटिल बनला आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यात हिंदू मुस्लिम धर्म भरला आहे. त्यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढणे सरकार अन शिक्षकांची जबाबदारी आहे. पोर निरागस असतात. त्यांच्या पर्यंत ज्या आयडिया लवकर पोहचतात त्यांचा ते स्वीकार करतात. समाज कंटकांनी त्यांच्या पर्यंत द्वेष पोहचवला आहे. आपण त्यांना प्रेम शिकवण्याची गरज आहे. शिक्षकांनी ती जबाबदारी घेऊन पोरांना समजावले पाहिजे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.