मराठी लावणी चौदाव्या शतकातली. मात्र लावणीला बहर आला तो साधारणतः १८५० साली पेशवाईच्या काळात. पेशवांच्या आज्ञेवरून शाहीर होनाजी बाळाने लावणीला राग तालाचे रूप दिले. त्यापूर्वी लावणी कथारूप नादान गायली जायची. पेशवाईच्या काळात लोककलांना आणि लोककलावंताना मोठा राजाश्रय मिळाला. होनाजी बाळा, अनंत फंदी, राम जोशी, प्रभाकर आणि सगनभाऊ अशा पंच शाहिरांची परंपरा पेशवाईतलीचं. पेशवाईच्या दरबारात मस्तानी आणि फुलवंती या लोक कलावती अदाकारीसह पहिल्यांदा लोकरंजनाच्या दरबारी पेश झाल्या. तेव्हापासून मराठी माणूस आणि लावणी अतूट नातं सुरु झालं.
मराठी लावणी चौदाव्या शतकातली. मात्र लावणीला बहर आला तो साधारणतः १८५० साली पेशवाईच्या काळात. पेशवांच्या आज्ञेवरून शाहीर होनाजी बाळाने लावणीला राग तालाचे रूप दिले. त्यापूर्वी लावणी कथारूप नादान गायली जायची. पेशवाईच्या काळात लोककलांना आणि लोककलावंताना मोठा राजाश्रय मिळाला. होनाजी बाळा, अनंत फंदी, राम जोशी, प्रभाकर आणि सगनभाऊ अशा पंच शाहिरांची परंपरा पेशवाईतलीचं. पेशवाईच्या दरबारात मस्तानी आणि फुलवंती या लोक कलावती अदाकारीसह पहिल्यांदा लोकरंजनाच्या दरबारी पेश झाल्या. तेव्हापासून मराठी माणूस आणि लावणी अतूट नातं सुरु झालं.
पुढच्या काळात लोकरंजनासाठी अवघं आयुष्य वेचणारे लोककलावंत निर्माण झाले. सातू हिरु कवलापूरकर, पठ्ठे बापूराव फक्कड, दगडूबाबा साळी, अर्जुनबुवा वाघोलीकर, उमाबाबू सावळजकर, रघु इंदुरीकर अशा नामचिन शाहिरांनी, तमासगिरांनी मराठी मनाला पुरतं रिझवून टाकलं होतं. जुन्या जमान्यात तमाशाचा तोल कधी ढळला नाही. त्याचं कारण त्यात निख्खळ अध्यात्म होतं आणि सत्य विचारांची जपणूक ! म्हणून मराठी मनाची खास कला म्हणून ‘तमाशा अन त्यातही लावणी’ जनलोकाच्या मनात टिकून राहिली. लोकगंगेचा तो खळखळणारा प्रवाह होता. मराठीचा बोलका ताजा फुलोरा होता. समाज जीवनाला आवश्यक ते अध्यात्म नि शृंगार त्यात खचाखच भरला होता. तो काळ असा की, जगण्याला घडयाळाच्या काट्याची बोचणी नव्हती. कसलीच घाईगर्दी नव्हती. गण-गवळण रंगवावी, बतावणी लावणी, वाग अशा क्रमानं खेळाची आतीषबाजी चालायची. या साऱ्या कलेला इथल्याच जनामनानं फुलवलं होतं. ही कला शहाण्यानंच काय अडाण्यांनाही आपलीशी वाटली. उघड्या माळरानांवर, गावोगावच्या उरसातुन जत्रा यात्रांतून दहा पंधरा हजारावर जमलेल्या फाकड्या रसिकांना रात्र रात्र खिळवून ठेवण्याचं काम तमाशा फडबारीच करू शकली. आजवर दुसऱ्या कुठल्याच कलेला एवढी किमया साधता आली नाही.
जमाना बदलत राहिला. तमाशा ढोलकी फडाबरोबर महत्त्व आलं ते ‘संगीत बाऱ्यांना’. संगीत बाऱ्या म्हणजे तमाशाफड नव्हे. लावणी बाऱ्याला वेगळे आगळं ठाशीव-ठाशीव बांध्यात बसवलं ते संगीत बाऱ्यांनी. हा नवा प्रकार ढोलकी फड बाऱ्यांनीच रुजवला. लावणी गायनाला अन त्यातील कवनाला उदंड लोकप्रियता मिळाली. अनेक शाहिरांनी लावण्या चितारल्या त्या शृंगारिक, दिलखेचक, अन ढंगतदार ! तमाशा फडातूनच त्या सादरल्या गेल्या. अगणित लावण्या, काही लावण्यांचे रचनाकारही माहित नाही. अशा लावण्यांना चाली कुणी कधी अन कशा दिल्या हे सुदिक कुणाला कळलं नाही. मौखिक परंपरेतून एकाकडून दुसऱ्याकडे तिथून तिसऱ्याकडे अशी लावणी झिरपत राहिली. लावणीत भेदिकही आलं. लावणीची रुपडीतरी किती…अगणित ! लावणी गणाची, लावणी कृष्णाची, लावणी टाकणीची, वगाची भेदिकाची, ऐकिवाची, आख्यानाची, फडावरची…म्हटलंच तर शृंगारिक लावणी, उपदेशपर लावणी, विनोदी लावणी, स्थळकाळाचं वर्णन करणारी आणखी बैठकीची पारंपरिक लावणी….आणि पुढच्या काळात आली ती चित्रपटांतील लावणी असे तिचे विविधांगी प्रकार, तरीही लोकप्रियतेच्या शिखरावर दोन प्रकार गाजले. पैकी एक बैठकीची लावणी अन दुसरी खडी तमाशातली लावणी !
तमाशातली लावणी बोर्डावर उभी राहून उंच खड्या आवाजात, ढोलकी-चाळ अन तुणतुणाच्या तालावर पेश करण्याचा रिवाज….तर बैठकीची लावणी बसून, संथ आवाजात बाजाची पेटी आणि तबल्यावर म्हणायची असते. खरं तर लावणीत सगळ्यात महत्त्व आहे ते मुद्राभिनयाला ! अशा लावणीत भावकामाला महत्त्व असून ती रागदरीवर आधारलेली असते. त्यामुळे शास्त्रीय बैठकीचा बाज तिला लाभला. ठुमरीच्या नादानं लावणी गाऊ जाऊ लागली. नुसतं शृंगारात न राहता तिचं रुपडं हळूहळू बदलत गेलं. त्यातून तरल भावना व्यक्त होऊ लागल्या. पुढच्या काळात टप्याचा भाग आला. टप्पा म्हणजे गळा फिरवणं त्यातून नवनवीन अविष्कार येत गेले. यात पुढे ठुमरीच्या बरोबर ख्याल आला. तरल भाव आला म्हणजे लोकगीताची धाटणी पेश झाली. अशा काळाबरोबर बदलत्या अविष्कारमुळं भरभरून दाद देणारा, खळाळणारा, अवखळणारा श्रोता मिळाला अन् लावणीनं ठेका धरायला लावला.
‘ऐकून दाद आले डोळा पाणी
म्हणे काढ सखे गं रत्नाची खाणी…’
अशा लावणीच्या मुखड्यातच त्याचा भाग होता.’गळा फिरवणं’ ह्याचा प्रत्यय होता. पूर्वीच्या जमान्यांत लावणी गायकीला बाईला बंदी होती. पुरुषानंच गवई बनून गायचं होतं. त्यातून पोरीला हळू चाल सांगतानाचं चित्र पुरुष गवयानं उभं केलं होतं.
‘आता गं पोरी हळू चाल
जोडवं टचकलं…
जोडवं टचकलं
कमर तुझी लचकल गं।।
बाळ्या बुगड्याचा झोक
तुझ्या कानांमधी
चोळी पिवळी
शिमग्याचा सणामंधी
अशा स्वरूपाच्या कवनांना आणि गायकीला भरभरून लोकप्रियता मिळाली.
तसं बघता लावणीचा खरं सामर्थ्य तिच्या मुखड्यात असतं, असा मुखडा घोळून घोळून म्हटला जातो. बोर्डावर तो वेगवेगळ्या भावविभ्रमानं नटवायचा असतो. रंगछटांनी सजवायचा असतो. तेव्हाचं ‘लावणीतलं लावण्य प्रकट होतं. लावण्यवतींचा एक काळ भरभराटीचा आणि बहराचा काळ होता. हस्तमुद्रा, पदन्यास आणि मुद्राभिनयांतून रंगनायिका पेश व्हायच्या. त्यातून धुमाळी, आडा चौताला, एक तालातून सादरलेल्या लावण्यांनी लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं. बालेघाटी, जुन्नरी, छक्कड अशा वेगवेगळ्या छटांतून सादरलेल्या लावण्यांना बहुआयामांनी ज्या अदाकारांनी सजवलं होतं. त्या साऱ्या इथल्याच मराठी मातीच्याच कलावती होत्या.
त्यात होत्या सुंदराबाई, सत्यभामाबाई पंढरपूरकर, कौसल्याबाई कोपरगावकर, लैला-चांगुणा जेजुरीकर, हिराबाई अवसरीकर, शेवतांबाई उरळीकर, गुलाबबाई संगमनेरकर, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर आणि पदम् पुरस्कारांनी सन्मानित यमुनाबाई वाईकर! अशा कैक गुणवतीनींनी आपल्या अंगच्या उदा. नखऱ्यांन अवखळ नजाकतीनं मराठी मनावर भुरळ घातली होती. या कलावंतींनी कितीदातरी मराठी मुलखाबाहेर जाऊ मानपान मिळवून आल्या होत्या.
लावणीसम्राज्ञी अशी बिरूदावली मिरवणाऱ्या यमुनाबाई वाईकरांनी लावणीकला मराठी मुलूखाबाहेर नेऊन सादरली अन् लोकप्रियही केली. यमुनाबाई लावणीची पेशकश ऐकणाऱ्याला पुरतं मंत्रमुग्ध करून सोडीत.
झालं असं होतं की कोलकत्त्याला अखिल भारतीय लोककला महोत्सव होता. देशभरातून आलेले नामांकित शागिर्द प्रेक्षकांना आपली कला पेश करून खिळवून ठेवत होते. त्यात वयाची पासष्टी ओलांडलेल्या यमुनाबाईंनी आलाप घेऊन अडाचौतालातही लावणी सादर केली.
अहो भावोजी कोरा माल
मुखी विडालाल
तीळ झळकती… सखेबाईऽऽ
लावणी मुखडा … एक-एक अंतरा बाईंच्या अदाकारीमधून निखळ शृंगारभावना सादरणारी एक लावण्यवती, रसिकांच्या डोळ्यांसमोर उभी रहात गेली. तिच्या डोळ्यांतली हावभाव, शब्दाशब्दामधला लाडीक भाव हाताच्या ओंजळीचे रूप विभ्रम उभ करण्याचे सामर्थ्य., ढोलकीच्या तालावर नाचणारी वादकाची हळूवार बोट, त्यामधनं निघणारं बोल हे सारं पाहून ऐकून वाटायला लागलं की, प्रणय सुखाची आस धरणारी कुणी प्रेयसी प्रियकराच्या लाडिक शब्दांनी कुजबूज करते आहे.
कार्यक्रमाला उपस्थित हिंदू दैनिकाचे संपादक सत्यजित रे यमुनाबाईंच्या अदाकारीने भारावून गेले. अवघं थिएटर टाळ्यांच्या कडकडाटात यमुनाबाईंना अभिवादन करण्यासाठी उभं राहिलं… असाच एक प्रसंग दिल्लीमधल्या फेस्टिवलमध्ये आला. तिथे तालाच्या लावण्या पेश करायच्या होत्या. पं. बिरजूमहाराजांसारखे प्रसिद्ध कथ्यककार आपली कला सादरणार होते. जेव्हा यमुनाबाई माईकसमोर गायला बसल्या तेव्हा शरीरानं स्थूल झालेली वय झालेली बाई काय गाणार, म्हणून प्रेक्षक हसायला लागले. पण बाईंनी पहिलाच आलाप असा घेतला की त्यानं उपस्थितंच्या हृदयालाच हात घातला. त्यांच्या आवाजातली जादू बघून तुडूंब भरलेल्या नाट्यगृहातला प्रेक्षक एकदम चकित झाला. बाईंच्या नजाकतीनं घायाळ होत राहिला…. शब्द होते.
‘शहर बडोदे सोडुनि दिधले
वर्ष जाहली बारा…
माझा सखा कुणीकडे गेला गं. बाई गंss’
या लावणीतून सहज बारा वर्षे सखा दूर राहिल्यानं अभिनयातून व्यक्त केलेला विरह प्रेक्षकांचं काळीज भेदून गेला. बिरजू महाराजांनी यमुनाबाईंना येऊन मिठीच मारली. ते म्हणाले.. “आप तो मेरी माँ समान है, इतने दिन कहाँ थी आप ? अगर ये लावणी जैसी चीज पेश नहीं करती तो हम इस कलासे अजनबी रहते ! कितना गहरा अर्थवाही यह कलाकार है | और आपने कितने सामर्थ्य से इसे पेश किया | यह सभी शृंगार भाव थे | लेकिन कहा भी अतिशयोक्ती या बीभत्स भाव नहीं था | मै तो भक्तीमय होकर लावणी सुन रहा था, देख रहा था | आप बहुत बडे कलाकार और अदाकारा है | मै विनम्रता से आपको प्रणाम करता हु |”
पुढच्या काळात पं. बिरजू महाराजांनी लावणीबरोबर ठुमरी असा संमिश्र कार्यक्रम घेतला. बिरजू महाराजांनी यमुनाबाईंना लावणी गायला लावून कथ्थक सादर केलं. तर ठुमरीवरबाईंनी अदा पेश करून दाखवली. हा लावणीचा मोठा सन्मान होता. अभिनयाला भाषा महत्त्वाची नसते. सूर ताल लय पक्का असावा लागतो.
यमुनाबाईंनी लावणीला नवा अर्थ दिला. वेगळा आयाम दिला, त्यांनी सादरलेल्या ‘अहो भावजी कोरा माल, मुखी विडा लाल…’ असो वा चौकाची लावणी… ‘शुद्ध श्रावणमासी सोमवारी बेल वाहीऽs… झाले प्रसन्न शंकर आडवा तासऽऽ… माया घरावर ग पिंगळा किजबिजला बाईs ईss होताच शकून नार चेहऱ्याकडे पाहीऽऽईऽऽ’ किंवा बाईंनी गायलेली … ‘डोळे तुमचे जादुगिरी… माझ्याकडे पाहू नका’ अशा एका चढ एक लावण्या रंगतदार केल्या. अंगभूत अभिनयानं साजिवंत झाल्या.
यमुनाबाई वाईकर, कौशल्याबाई कोपरगावकर, सत्यभामाबाई पंढरपूरकर अशा लावणी अदाकारांनी लावणीतून विविधता आणली. त्यांनी सुरावटीला आळवलं. शब्दा शब्दातून वास्तवरूप उभं केलं. त्याबरोबरच हस्तमुद्रा, पदन्यास आणि मुद्राभिनयाचा बेमालूम वापर केला। म्हणूनच लावणी निखळ मनोरंजन करणारी नव्हे समग्र नवरसाचे दर्शन देणारी आणि अभिनयाचं दर्शन घडवणारी ठरली. हजारोंचा लोकरंग एके काळी त्यात तल्लीन झाला.
काळ झपाट्याने बदलत गेला तशा मनोरंजनाच्या आवडीनिवडीही बदलत गेल्या. सुरुवातीचा मराठी सिनेमा लावणी आणि तमाशाचं कथानक घेऊन कित्येक वर्षे तगला होता. पण पुढच्या काळात ‘तमाशा’त सिनेमा शिरला. दूरदर्शन आलं. मनोरंजनाची साधनं आली. औद्योगिकरण आलं. शेतकरी-कामकरी तमाशा थिएटरांनी फिरकेनासा झाला. ‘तमाशा’ मनोरंजन त्याला तोकडं वाटायला लागला. तमाशा थिएटरांची जागा सिनेमागृहांनी घेतली. मराठी माणसाचं जीवनमान गतीमान झालं. तसं तमाशात कलामूल्य काळवंडत गेलं. त्यात तोच तोचपणा उरला. नवनवीन आशय विषयाची गुणात्मक मांडणी नसल्यानं प्रेक्षकही त्याला कंटाळला.
मात्र तमाशा कला एकीकडे अशी अस्तंगत होत असताना त्यातली लावणी मात्र आजवर टिकून आहे. कशीबशी बेहोशीच्या कैफात नटून थटून उभी आहे. पाश्चात्त्य (वेस्टन) बाजाच्या नजाकतीवर थिरकते आहे. व्यावसायिकतेच्या बॅनरखाली धन-दौलत ओढते आहे. तिला दटून दाटून आश्रय मिळतोय तो परिसरातल्या कलाकेंद्रांचा आणि एअरकंडिन्ड थिएटरांचा!
आज सादरली जातेय ती निव्वळ नृत्यप्रधान लावणी. नृत्याविष्कार निवडून लावणीची पुरती मोडतोड केली जातेय, खरं तर लावणीतून सुरांची उपळण व्हावी लागते. अन् शब्द तर रंगपंचमी खेळणारे वाटावे लागतात. शब्दाशब्दांतून वास्तव रूप उभं रहाण्यातच लावणीची नजाकतता आहे. मात्र आज शब्दांना समजावून घेण्यात कुणीही अदाकारा तसदी घेताना दिसत नाही. लावणीतल्या साहित्याला दटावलं जातंय, आता जुनं गाणं घेऊन नवं रूप तरंगताना दिसत नाही. जे काही आज चाललंय ते बघवत नाही. ऐकवत नाही. सारा साजवाज मोडीत निघालाय.
पूर्वी लावणीचं सादरीकरण पारंपरिक वाद्यांच्या नादमेळ्यात सादर व्हायचं. डोलकी तुणतूण लावणीचा ठेका घरी. टिपेची हर एक वाद्य गोडवा वाढवीत आता ढोलकी, तुणतुण्याची जागी अंक्टोकेंड, ऱ्हिदम, खंजीर, ऑर्गन असा कुठला कुठला बेस्टर्न बाज आलाय. त्यानं संगीताचा गोडवा मधुर नाही तर बधीर झालाय. जी गोष्ट वाद्यांची तिच गत वेशभूषेची…. पूर्वी मराठी मोळी लावणी नऊवारी लुगाड्यात चापून चोपून असायची, बरती सोळा शृंगाराच्या साजानं पुरती नटायची. आता साज नाही न बाजही नाही. पायता छुमछुमणारी घुंगर नावालाच राहिलीत. पुर्वीचाभारदार चाळ नाही अन् ठेका धरणारा टाळही नाही. ना अदा ना नखरा ! टायटल म्हणा बॅनर म्हणा वेगळं दिसलं छान छौकीतल्या मुली जाहिरातीवर दिसल्या, नाव गाव असलेल्या वाटल्या की रेकॉर्डवर लावणी लावावी अन् त्यांनी कसं बी नाचून दावलं की, माणसांनी तोबा गर्दी करावी, अशा ठिकठिकाणच्या चौफुल्यातली गर्दी मग मदनाच्या बेहोशीत दौलत जादा करून लयलूट करत राहिली.
लावणी सादरीकरणाचा एक प्रकार असतो. तो नाजूक नजाकतीच्या अंगानं, सामान्य स्थितीत करण्याचा अन् दुसरा असतो तो अर्थानुरूप मांडण्याचा. हे करताना कसलाही अंगविक्षेप न करता, रसात्मक मांडणीतून भावदर्शन करावं लागतं. नुसतं सांगणं आणि भावनात्मकदृष्ट्या मांडणं, समोरच्याच्या भावना चाळवणं हा जो कलाप्रकार असतो, तो साऱ्याचं कलावंतांत नसतो. ज्यांनी अविरत कष्टानं, अध्ययनानं हे आत्मसात केलेलं आहे. शब्द आणि काव्य समजून उमजून घेतलेलं आहे. अविरत चिंतन, मनन केलेलं आहे त्यांनाच हे शक्य होतं.
….खंत आहे. आज चाललेला ढोलकीचा खणखणाट अन् घुंगरांचा छनछनाट मनाला पटत नाही. तसा हा नादच खुळा ! त्यातून असलीच एखादी सोळा हजारात देखणी ! हिरकणी ! नटरंगीनार !… शुक्राची चांदणी ! नटखट अप्सरा ! लावण्यसखी !… म्हणून का दिलवरांनी, धनदांडग्यांनी, राजधुरंधरांनी तिच्या कैफात पुरतं बुडून बदनाम व्हायचं. विक्षिप्तपणा करून थिल्लरपणा करून कला-कलावतींना वेठीस धरायचं?
उलट आजही ‘सखी माझी लावणी’ म्हणून कलेचा स्वाद घ्यावा. निखळ निर्भळ-निर्मळ आनंद लुटावा, प्रोत्साहन द्यावं, त्यामुळे कलावंताला प्रोत्साहन मिळेल, कलावंत टिकल. कांद्याला चांगला भाव मिळतोय म्हणून जो तो कांदाच पिकवून बाजारात आणतोय. या कला क्षेत्रात असं होता कामा नये. ‘लावणी’ बाज नव्या रूप- स्वरूपात टिकवायचा असेल, तर या प्रतिभेच्या लेण्याला जपायला हवं. त्यासाठी कला-रसिकांनी, जाणकारांनी, साहित्यकारांनी, कवी शाहिरांनी, अभ्यासकांनी ‘लावणी’साठी यागेदान द्यायला हवं.
आजच्या काहीतरी मराठमोळ्या रसिकांना निखळ अभिनयाच्या नाट्याची ओढ आहे. ही वेगळेपणाची ओढ आहे. तिच्यामध्ये अर्थ आहे. तेव्हा प्रेक्षकांना निखळ कलेची ओढ निर्माण झाली तर पुन्हा यांना ‘तमाशा’ बाजाकडे अनु नजाकतीच्या लावणीकडे वळण्यावाचून गत्यंतर उरणार नाही. तर आणि तरच ही अस्सल मराठमोळी रांगडी बाजाची मानाची कला टिकेल!
प्रभाकर ओव्हाळ
भ्रमणध्वनी ९८२२६५५१९१
वडगाव मावळ, जि. पुणे – ४१२१०६
हे खास आपल्यासाठी
अख्खा महाराष्ट्र ज्या गाण्यांवर नाचतो त्या लोकगीतांचा बादशाह म्हणजे साजन बेंद्रे.