फेब्रुवारी 4, 2026

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

नो ब्राह्माण, नो अक्षता, ना कसले धार्मिक विधी सत्यशोधक लग्ने वाढत आहेत

मार्च संपत आला आहे लग्नाचा सीझन जोरात चालू आहे. आपल्या सगळ्यांच्याच संपर्कातल्या कोणा ना कोणाचं तरी लग्न या काळात होत आहेच. यावरून सोशल मीडियावर अनेक मीम्सही आपण पाहतो . या लग्नांच्या बाबतीत आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे सध्या अनेक जण सत्यशोधक पद्धतीने विवाह करत आहेत. पण सत्यशोधक पद्धतीचा विवाह काय असतो? तो कसा आणि का करावा असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. अनेक जणांनी तर नुसतं कधी तरी कोणाकडून ऐकलेलं असतं. महात्मा फुले आणि सावित्री बाई फुलेनी सुरु केलेल्या सत्यशोधक लग्नांची पद्धत आणि प्रवास आपल्याला माहिती पाहिजे.

सत्यशोधक विवाहाचा इतिहास

देशातला पहिला सत्यशोधक विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांनी घडवून आणला. ब्राह्मणाशिवाय झालेल्या या विवाहात वराचे नाव सीताराम जबाजी आल्हाट तर वधूचं नाव राधा असं होतं. या लग्नाचा खर्च सावित्रीबाई फुले यांनी स्वतः केला होता. महात्मा फुले यांचा कर्मकांडाला विरोध असल्याने या विवाहामध्ये कर्मकांडाला फाटा दिला जातो. अशा पद्धतीच्या लग्नामध्ये अनिष्ट रुढी, मानपान, परंपरा, अनावश्यक खर्चाला विरोध करत साध्या सोप्या पद्धतीने लग्न केले जाते. या विवाहप्रसंगी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेला किंवा पुतळ्याला अभिवादन केलं जातं.

कसा केला जातो सत्यशोधक विवाह ?

धान्याच्या अक्षतांऐवजी फुलांच्या पाकळ्या वधूवरांच्या डोक्यावर टाकल्या जातात. पारंपरिक मंगलाष्टकांऐवजी महात्मा फुले यांनी रचलेल्या मंगलाष्टका म्हटल्या जातात. या मंगलाष्टका संस्कृतऐवजी मराठीत लिहिलेल्या आहेत. जेणेकरून सामान्य माणसाला या लग्नसोहळ्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर या मंगलाष्टका छापील स्वरुपात उपलब्ध करून दिल्या जातात. त्यानंतर वधुवरांसाठी महात्मा फुले यांनी लिहिलेल्या शपथा वधू- वर घेतात. सात फेऱ्या ऐवजी सत्य, प्रेम, विवेक, अहिंसा, श्रम, सदाचार आणि परिवर्तन या सात तत्वांना मानलं जातं.
यानंतर लग्नगाठीप्रमाणेच महासत्यगाठ बांधली जाते. काही वेळा अशा प्रकारच्या लग्नांमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहितीही दिली जाते. काळ बदलला तसं या सत्यशोधक पद्धतीच्या विवाहाचं स्वरुपही बदललं. काही जोडपी विवाहासाठीचं गिफ्ट म्हणून केवळ पुस्तकंच स्विकारतात.

कोरोनामुळे अनेक जणांची लग्ने कमी खर्चात झाली पण आता परिस्थिती पूर्व पदावर आल्यावर लोक परत लग्नांवर लाखो रुपये खर्च करत आहेत. अश्या वेळेला सत्यशोधक पद्धतीने खर्च कमी होतो, ह्या लग्नांमध्ये बडेजाव नसतो त्यामुळे अनावश्यक गोष्टी टाळता येतात. या सगळ्यात महत्वाचे म्हणजे सत्यशोधक लग्नात क्रांतिकारी लोकांची प्रतिमा वापरली जाते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या साक्षीने लग्न करणं कोणत्याही देवाच्या पुढे लग्न करण्यापेक्षा चांगलं आहे.

फक्त बहुजनच नाही तर सवर्ण समजलेल्या जातीतील मुलं मुलींमध्ये देखील सत्य शोधक लग्नांबद्दल जागरूकता वाढत आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणारे मुले त्यांच्या लग्नात सत्यशोधक पद्धतीची निवड करून समाजापुढे आदर्श ठेवतात. आपण देखील याचा विचार करायला काय हरकत आहे. खर्च पण कमी होईल आणि सामाजिक बांधिलकीचं कर्तव्य देखील पूर्ण होईल.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.