समाज माध्यमांवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. शनिवारी संध्याकाळपासून हा व्हिडिओ आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना यात लक्ष घालावं लागलं. या व्हिडिओमध्ये एक जिल्हाधिकारी भररस्त्यावर एका तरुणाला कानशिलात लगावताना दिसत आहे. सोशल मीडियावर नेटिझन्सनी यावर चर्चा सुरु केल्यानंतर त्यातलं सत्य समोर आलं. व्हिडिओमध्ये तरुणाला कानशिलात लगावणारे छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा आहेत. या गैरवर्तणुकीबद्दल त्यांना तातडीने पदावरून हटवल्याचं छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विटरवर जाहीर केलं आहे. यासंदर्भात आयएएस अधिकारी रणबीर शर्मा यांनी व्हिडिओच्या माध्यमातून माफी देखील मागितली आहे. देशातील आयएएस वर्तुळातूनही रणबीर शर्मा यांच्या या वर्तनावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
शनिवारी अनेक नेटिझन्सनी ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष्य करत त्यांच्यावर टीका देखील केली. सुरजपूर जिल्ह्यामध्ये करोनाकाळात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील अनेकांकडून लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं दिसून येत आहे. सदर २३ वर्षीय तरूण आपल्या बाईकवरून जात असताना जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांनी तरुणाला थांबवलं. तरुणाची चौकशी चालू असताना जिल्हाधिकारी संतापले. त्यांनी सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांनाही तरुणाला मारण्यास सांगितलं. तरुणाने आधी आपण कोरोना टेस्ट करण्यासाठी जात असल्याचं सांगितलं. त्याच्याकडची पावती ही त्याने दाखवली. पण जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांना हा तरुण खोटं बोलतोय असं वाटलं. मोबाईल मधून शूटिंग काढतोय असं समजून त्याचा मोबाईल जोरात खाली आपटून फोडला. एवढंच नाही, तर त्याच्या कानशिलात देखील लगावली. त्याहीपुढे जात त्यांनी आपल्यासोबतच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही तरुणाला मारण्यास सांगितलं.
अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल !
हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यांनतर याची दखल अखेर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी घेतली. “सोशल मीडियावर सूरजपूरचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांच्याकडून एका तरुणाशी गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही एक दु:खद आणि निंदनीय घटना आहे. छत्तीसगडमध्ये असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. रणबीर शर्मा यांना तातडीने हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत”, असं ट्वीट मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केलं आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओद्वारे माफीनामा!
दरम्यान, रणबीर शर्मा यांनी देखील काय घडलं ते सांगताना माफी मागितली आहे. “जेव्हा मी त्यांना थांबवलं, तेव्हा ते म्हणाले की मी लस घेण्यासाठी जातो आहे. त्यांनी पावती दाखवली जी लसीकरणाशी संबंधित नव्हती. नंतर ते म्हणाले की मी माझ्या आजीला पाहायला जात आहे. त्यांनी गैरवर्तन केलं आणि मी रागात त्याला कानशिलात लगावली. मी माझ्या या वर्तनासाठी माफी मागतो”, असं रणबीर शर्मा यांनी म्हटलं आहे.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !