MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

विधान परिषेदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव

mahavikas aghadi

विधान परिषेदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव
महाराष्ट्रात विधान परिषेदेच्या निवडणूक झाल्या. कोल्हापूर मधून काँग्रेसचे सतेज पाटील आणि धुळे-नंदुरबार मतदार संघातून भाजपचे अमरीश पटेल बिनविरोध विधान परिषेदेवर गेले. नागपूर आणि अकोला वाशीम मतदार संघासाठी निवडणूक झाली. दोन्ही मतदार संघात भाजपने महाविकास आघाडीला मात दिली आहे. नागपूर मधून माजी मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे निवडून आले आहेत तर अकोला वाशीम मतदार संघातून वसंत खंडेवाल निवडून आले आहेत.

कोल्हापूर धुळे-नंदुरबार मतदार संघात बिनविरोध निवडणूक

विधान परिषेदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये बैठका झाल्या होत्या. कोल्हापूर मतदारसंघाच्या बदल्यात धुळे नंदुरबारची जागा महाविकास आघाडी भाजपाला सोडण्यास तयार झाली. भाजप देखील धुळे नंदुरबार आणि कोल्हापूर मतदार संघाच्या बिनविरोध निवडणुकीसाठी तयार झाली. नागपूर आणि अकोला-वाशीम मतदार संघासाठी भाजप आणि महाविकास आघाडीचे एकमत झाले नाही.

महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील कोल्हापूर मतदार संघातून आमदार आहेत. महाविकास आघाडीकडून या वेळेस देखील सतेज पाटील काँग्रेसचे उमेदवार होते. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महाविकास आघाडीचे संख्याबळ जिंकण्यासाठी पुरेसे आहे. त्यामुळे सतेज पाटील सहज निवडून येतील अशीच शक्यता होती. धुळे नंदुरबार मतदार संघात कोल्हापूरच्या उलट परिस्थिती आहे. भाजपचे अमरीश पटेल आमदार होते आणि ह्या निवडणुकीसाठी देखील पटेल हेच भाजपचे उमेदवार होते. धुळे नंदुरबार मतदार संघात भाजपचे पारडे जड होते त्यामुळे पटेल जिंकण्याची शक्यता जास्त होती.

नागपूरमध्ये नाना पटोले यांचा अंदाज चुकला

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. नागपूर महापालिकेतील भाजपचे नगरसेवक छोटू भुयार यांना काँग्रेस मध्ये घेऊन काँग्रेसची उमेदवारी दिली. छोटू भुयार यांची लढत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी होती. भाजपचा माणूस फोडून नाना पटोलेंनी नागपुरात भाजपाला चकित केले होते. छोटू भुयार भाजपचे नागपूर महानगरपालिकेत गट नेते होते. छोटू भुयार यांची आणि काँग्रेसची ताकद मिळून भाजपचा पराभव करू असा नाना पटोलेंना विश्वास होता. मतदानाच्या दोन दिवस अगोदर छोटू भुयार यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. ज्या छोटू भुयाराच्या जीवावर काँग्रेस निवडणूक लढवत होती त्यांनीच माघार घेतल्यामुळे काँग्रेसची नाचक्की झाली होती. छोटू भुयार यांनी माघार घेतल्यावर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुखांना काँग्रेसला पाठिंबा द्यावा लागला. आज निवडणुकीचे निकाल आले. भाजपचे चन्द्रशेखर बावनकुळे याना ३८५ मते मिळाली आणि अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख १८५ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर काँग्रेसने ज्यांना उमेदवारी दिली त्या छोटू भुयार यांना १ मत मिळाले आहे. छोटू भुयार यांना उमेदवारी देऊन नाना पटोलेंचा नागपूर मध्ये अंदाज चुकला आहे.

अकोला वाशीम मतदार संघात शिवसेनेचा पराभव

शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया हे अकोला वाशीम मतदार संघाचे विद्यमान आमदार होते. बाजोरिया सतत तीन वेळा निवडून आले आहेत. ह्या निवडणुकीसाठी देखील शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून गोपीकिशन बाजोरिया उमेदवार होते. भाजपने गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात वसंत खंडेवाल याना उमेदवारी दिली होती. आजच्या निकालांमध्ये भाजपच्या वसंत खंडेवाल यांनी गोपीकिशन यांचा १८५ मतांनी पराभव केला. तीन टर्म आमदार असलेले गोपीकिशन बाजोरिया याना मात देऊन भाजपने महाविकास आघाडीला विदर्भात चांगलाच धक्का दिला आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.