प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांनी पद्म पुरस्कार जाहीर केले. त्यात चार पद्मविभूषण, सतरा पद्मभूषण आणि एकेचाळीस पद्मश्री आहेत. पद्म पुरस्काराच्या माध्यमातून साहित्य, कला, सामाजिक सेवा, खेळ आणि इतर क्षेत्रात विशेष काम केलेल्या लोकांचा सन्मान केला जातो. त्यामुळे साहजिकच ज्या लोकांना पद्म पुरस्कार जाहीर होतात ते त्याला आनंदाने स्वीकारतात. देशाने त्यांच्या कामाचा केलेला तो सत्कार असतो. पण कम्युनिस्ट पार्टीचे जेष्ठ नेते आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेब भट्टाचार्य यांनी मात्र पद्मभूषण नाकारला आहे. मला पुरस्काराची काहीही माहिती दिली नसल्यामुळे मी पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे त्यानी समाज माध्यमांना सांगितले आहे.
आम्ही जनतेसाठी काम करतो त्यामुळे सरकारी पुरस्कार स्वीकारत नाही.
महात्मा गांधी म्हणायचे विचाराशिवाय राजकारण होऊ शकत नाही. तुम्ही आता म्हणाल, राजकारणात कोणाला विचार आणि विचारधारा असते ? आज ह्या पार्टीत तर उद्या त्या पार्टीत हे सर्रास चालतच की ! तर तुमचं खरंय. आजच्या राजकारणाकडे थोडं बारकाव्याने बघितलं कि असच दिसतं. पैसे कमावणे हा एकमेव विचार शिल्लक राहिल्याचं वाटून जात. पण थांबा तुमचं लाल बावट्यावाले कार्यकर्त्यांबद्दल वाचायचं राहील आहे . आता हे लाल बावट्यावाले कोण तर कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते. जे एकमेकांना कॉम्रेड म्हणतात . कॉम्रेडला शुद्ध मराठीत आपण सहकारी म्हणू शकतो. पण कॉम्रेड मध्ये जी क्रांती आहे, जो जोश आहे तो सहकारी शब्दात कुठे ? त्यामुळे ते एकमेकांना कॉम्रेड अशीच हाक मारतात. तर असो कार्ल मार्क्सचे समाजवादी विचार घेऊन राज्य करायचं हे त्यांचं ध्येय. लेनिनने ती क्रांती रशियामध्ये करून दाखवली. पण इतर ठिकाणी जमली नाही. इतर ठिकाणी क्रांती यशस्वी झाली नसली तरी आम्ही ती एक दिवस नक्की करून दाखवू असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे क्रांती करायची असेल तर क्रांतीला पूरक वागावे लागेल, जनतेची कामे करावी लागतील, सरकारच्या विरोधात संघर्ष करावा लागेल ह्यावर सर्व कॉम्रेडच एकमत आहे. सरकार आपल्या संघर्षाची धार कमी करण्यासाठी आपल्याला कधी कधी पुरस्कार सुद्धा देऊ शकते त्यामुळे कॉम्रेड्सनी सरकारी पुरस्कार स्वीकारायचे नाही असा एक अलिखित नियम केला आहे. त्यामुळे कुठलाही कॉम्रेड सरकारी पुरस्कार स्वीकारत नाहीत. बुद्धदेब भट्टाचर्यांनी पण त्याच नियमाचे पालन करून पद्मभूषण नाकारला आहे. बाकी पक्षातले लोक कितीही पार्ट्या बदलू द्या पण लालबावट्यावाले विचार आणि विचारधारा सोडत नाहीत हे बुद्धदेब भट्टाचार्यानी दाखवून दिलय.
पद्म पुरस्कार देण्याच्या अगोदर पुरस्कर्त्यांना माहिती दिली जात नाही का ?
पुरस्कार नाकारताना बुद्धदेब भट्टाचार्यानी सरकारने मला माहिती दिली नसल्याचा आरोप केला आहे. पण हा आरोप ग्राह्य धरला जातो का ? माहिती देणे सरकारला आवश्यक आहे का हे तपासून पहिले पाहिजे . पुरस्कार प्राप्त व्यक्तीला माहिती देणं गरजेचे नसते. असा कुठला नियम देखील नाही. पद्मपुरस्कर्ते निवडण्याची एक सरळ प्रक्रिया असते. केंद्र सरकार ऑक्टोबर महिन्यात राज्य सरकारांकडे पद्म पुरस्कारासाठी शिफारशी मागते . राज्य सरकारे त्यांच्या राज्यातील कला , साहित्य, खेळ, सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रात काम केलेल्या लोकांची शिफारस करते. राज्य सरकारकडून शिफारशी आल्यावर केंद्र सरकारचे गृहमंत्रालय त्याची तपासणी करते. ज्या लोकांच्या शिफारशी आल्या आहेत त्यांना पुरस्कार दिला जाऊ शकतो का याचा विचार होतो. ज्या लोकांना पुरस्कार दिलॆ जाऊ शकतात त्यांची नावे राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवले जातात. अंतिम निर्णय राष्ट्रपती घेतात आणि २५ जानेवारीच्या सायंकाळी पद्म पुरस्कार जाहीर केले जातात. राष्ट्रपती पुरस्कार जाहीर करण्याच्या आधी एक तास पुरस्कर्त्यांना राष्ट्रपती कार्यालयाकडून त्याची माहिती दिली जाते.
हे खास आपल्यासाठी
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय