आपल्या पुण्याच्या कोणत्याही रस्त्यावर जा आणि कोणालाही विचारा, जेएनयू बद्दल तुला काय वाटत ? काही जण म्हणतील भारतातलं सर्वात चांगलं विद्यापीठ आहे तर काही लोक म्हणतील जेएनयू मध्ये देश विरोधी पोर शिकतात. मत काहीही असू द्या पण तुम्हाला माणूस सापडणार नाही ज्याला जेएनयू बद्दल माहिती नाही, विद्यापीठाबदल मत नाही. एवढं फेमस आहे जेएनयू.
तर आज जेएनयूच्या विषय काढायचा मुद्दा हा आहे कि आपल्या पुण्याच्या प्राध्यापिका ‘ संतिश्री पंडित ‘ यांची जेएनयूच्या कुलगुरू पदी निवड झाली आहे. देशाच्या सर्वात चांगलं मानांकन असलेल्या विद्यापीठाच्या कुलगुरू पदी मराठी महिला जात असेल तर अभिमान तर वाटणारच ना ? संतिश्री पंडित यांच्या विषयामुळे जेएनयूचा विषय निघालाच आहे तर आपण जेएनयू बद्दल माहिती घेतली पाहिजे. देशाच्या राजधानीत असलेलं विद्यापीठ नेहमी का वादात असतं ? जेएनयू विद्यापीठात असं काय वेगळं शिकवलं जात कि तिथले पोरं नेहमी आंदोलन करतात.
कन्हैया कुमारच्या प्रकरणामुळे जेएनयूची बदनामी झाल्याची बोललं गेलं..
जेएनयू मध्ये देशभरातून पोरं पोरी शिकायला येतात. साहजिकच पूर्ण भारतातून विद्यार्थी येत असल्यामुळे जेएनयू मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या राज्यातील कार्यक्रम विद्यापीठात घेतात. विद्यापीठ देखील कार्यक्रमांना परवानगी देतं. ही आपल्या भारताची सुंदरता नाही तर काय आहे. आपल्या भारता एवढी विविधता कुठं सापडेल ?
तर झालं असं २०१६ च्या फेब्रुवारी मध्ये काश्मीरच्या विद्यार्थ्यांनी ‘अफजल गुरूची’ पुण्यतिथी साजरी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप झाला. प्रकरण एवढं मोठं झालं कि विद्यार्थी नेता कन्हैया कुमारला पोलिसांनी अटक केली. काही दिवस जेल मध्ये राहिल्यावर कन्हैया कुमारला जामीन मिळाला. जामीन झाल्यावर कन्हैया कुमारने जेएनयू मध्ये ऐतिहासिक भाषण दिलं. त्याच्या भाषणाचे प्रक्षेपण देशभरातल्या वाहिन्यांनी केलं होत.
देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आणि कन्हैया कुमारने दिलेल्या भाषणामुळे सगळ्या देशभर जेएनयूच्या चर्चा सुरु झाली. काही लोकांनी कन्हैया कुमारच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला तर काहींनी त्याला देशविरोधी ठरवलं. ह्या सगळयात जेएनयूची मात्र फार बदनामी झाल्याची बोललं गेलं.
१९६९ साली स्थापन झालेल्या जेएनयूला आंदोलनांचा इतिहास आहे.
सध्या जेएनयू देशातील सर्वात चांगलं विद्यापीठ आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते जेएनयूला दरवर्षी सर्वोउत्कृष्ट पुरस्कार मिळतो. ‘इंदिरा गांधी’ पंतप्रधान असताना १९६९ ला जेएनयूची स्थापना झाली. विद्यापीठ राजधानी दिल्लीत असल्यामुळे विद्यापीठ खूप कमी वेळात नावारूपाला आलं. देशभरातले हुशार विद्यार्थी जेएनयू मध्ये शिकण्यासाठी येत. वेगवेगळ्या विचारधारा असलेले विद्यार्थी जेएनयू मध्ये शिकतात.
विद्यापीठाच्या स्थापनेच्या ६ वर्षानंतर म्हणजे १९७५ च्या जून महिन्यात इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली. आणीबाणीला देशभरातून विरोध सुरु झाला. जे पी नारायण यांच्यापासून सर्व विरोधी पक्षातले नेते आंदोलन करत होते. आंदोलन करणाऱ्या सर्व नेत्यांना इंदिरा गांधी सरकारने जेल मध्ये टाकले. त्यामुळे आणीबाणीच्या विरोधातील आंदोलन फक्त विद्यार्थीच चालू ठेवू शकत होते. विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडणे सरकारला शक्य नव्हते. कारण त्यामुळे वातावरण सरकारच्या विरोधात जाऊ शकलं असतं. आणीबाणीच्या कठीण काळात जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी देशातल्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व केलं. आणीबाणी विरोधात जेएनयू मध्ये आंदोलन सुरु झालं. महत्वाचे नेते जेलमध्ये असताना आणीबाणीच्या विरोधातील आंदोलन आम्ही चालवू असा विश्वास जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी देशाला दिला. सीताराम येचुरी आणि इतर विद्यार्थी नेते आंदोलनाचे नेतृत्व करत होते.
सरकारच्या विरोधात आंदोलन करायला जेएनयूचे विद्यार्थी कधीही घाबरत नाहीत. आणीबाणी नंतर आलेल्या सर्व सरकारच्या काळात जर विद्यार्थ्यांना सरकारची भूमिका न पटल्यास ते आंदोलन करतं. आणीबाणीच्या काळात त्यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात आंदोलन केली आणि आज देखील जेएनयूचे विद्यार्थी सरकारच्या विरोधात आंदोलन करतात. जेएनयू म्हंटल कि आंदोलन आलंच !
संतिश्री पंडित जेएनयुच्या पहिल्याच महिला कुलगुरू होणार आहेत.
संतिश्री पंडित मराठी असल्यामुळे आपल्याला अभिमान वाटणे साहजिकच आहे. पण जेएनयूच्या ५२ वर्षाच्या कारकिर्दीतल्या त्या पहिल्याच महिला कुलगुरू ठरणार आहेत. आता पर्यंत जेएनयूचे सर्व कुलगुरू पुरुष होते. त्यांच्या काळात जेएनयू जगभरात पोहचलं. जेएनयूच्या चर्चा जगभरात होत असते. संतिश्री पंडित त्यांच्या काळात त्या काय सुधारणा आणि बदल करतात बघणे महत्वाचे ठरणार आहे.
हे पण वाचा
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !