MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

संत रोहिदास भारतातील एकमेव संत ज्यांना सोळा नावाने ओळखलं जातं.

sant rohidas information in marathi

संत रोहिदास हे भारतातील एकमेव संत आहेत ज्यांना सोळा नावांनी ओळखलं जातं. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील असला तरी त्याचे सामाजिक कार्य उत्तर आणि दक्षिण भारतात पसरले होते यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. उत्तर प्रदेश मध्ये रविदास, पंजाबमध्ये रैदास, बंगालीमध्ये रुईदास आणि महाराष्ट्रात रोहिदास किंवा काही भागात रोहितदास म्हणून ओळखलं जातं. संपूर्ण भारतात संत रोहिदासांचं अस्तित्व मिळतं तरीही त्याच्या कार्याचा उचित गौरव अजूनही आपल्या राज्यकर्त्याना करता आला नाही. संत रोहिदासांचे कार्य समजून घेतले तर तर लक्षात येईल कि त्यांनी भेदाभेद आणि विषमता निर्मूलनाचा असा विचार मांडला कि जो सर्व मानव जातीच्या कल्याणाचा होता.

उत्तर प्रदेशातील काशी जवळ असणाऱ्या मांडूर गावात इसवी सन १३७६ ला त्यांचा जन्म झाला. काही तज्ज्ञांच्यानुसार त्यांचा जन्म वाराणसीजवळ गोवर्धनपूर इथे झाला. रोहिदास यांनी रैदास रामायणात लिहिल्याप्रमाणे त्यांचा जन्म मांडूर इथेच झाला. माघ महिन्यातील पौर्णिमेला त्यांचा जन्मदिवस मानला जातो. या वर्षी १६ फेब्रुवारीला संत रोहिदासांची जयंती आहे. रोहिदासांची आई काळसी आणि वडील रघु यांच्या पोटी सूर्यासारखा तेजस्वी मुलगा झाला म्हणून रविदास नाव ठेवण्यात आले.

रोहिदासांची आई रामभक्त होती. वडील व्यवसायाने चांभार होते. घरातील सात्विक वातावरणामुळे त्यांना अध्यात्माची आवड लागली. कीर्तन, प्रवचन आणि संतांच्या छायेखाली राहणे याची त्यांना आपसूकच सवय लागली. अध्यात्मासोबत चर्मकार कुळात जन्म झाल्याने चप्पल काम करणे हे पण त्यांच्या आवडीचं काम होतं. रोहिदासांनी त्यांच्या कामाला कधीच कमी लेखलं नाही. म्हणूणच त्यांचं काम ते आवडीने करायचे. बालपणीच रोहिदासांच्या विचारांना आकार आला होता त्यामुळे उच्च-नीच, जात , विषमता या गोष्टी रोहिदासांना खटकू लागल्या होत्या. समाजातील जातीवाद, उच्च नीच, गरीब श्रीमंती या प्रश्नांचे उत्तर शोधताना ते बैचेन होत असे. रोहिदास या गोष्टींवर त्यांचे हळूहळू विचार मांडू लागले. त्यांचे हे विचार आज मानव मुक्तीच्या मार्गाकडे जातात. म्हणून संत रोहिदासांचे विचार आजच्या काळात खूप महत्वाचे आहेत.

वयाच्या १३ व्या वर्षी रोहिदास यांचा लोना नावाच्या मुलीशी विवाह झाला. पुढे त्यांना विजयदास हा मुलगा झाला. रोहिदास गृहस्थ धर्मात होते पण त्यांनी स्वार्थ कधीच सोडला होता. हाताने चप्पल बनवत असताना मुखी राम नाम जप चालू असायचा. एखादा साधू संत पैसे नाही म्हणाला तर रोहिदास फुकट चपलेचा जोड देऊन टाकायचे. यामुळे संसार आणि व्यवसाय दोन्ही उघड्यवर येतील अशी अवस्था झाली. रोहिदासांच्या वडिलांनी त्यांनी घरातून काढून दिले पण यामुळे रोहिदासांनी भक्ती मार्ग सोडला नाही. रोहिदास म्हणतात,

अब कैसे छूटै राम नाम रट लागी ।
प्रभु जी, तुम चंदन हम पानी , जाकी अँग-अँग बास समानी ।
प्रभु जी, तुम घन बन हम मोरा , जैसे चितवत चंद चकोरा ।
प्रभु जी, तुम दीपक हम बाती , जाकी जोति बरै दिन राती ।
प्रभु जी, तुम मोती हम धागा , जैसे सोनहिं मिलत सुहागा ।
प्रभु जी, तुम तुम स्वामी हम दासा , ऐसी भक्ति करै रैदासा ।

भक्तिमार्ग हा ईश्वराच्या थेट जवळ जातो म्हणून संत रोहिदासांच्या प्रत्येक वाक्यात ते थेट देवाशी संवाद करतात. रोहिदासांच्या प्रतिभेला ओळखून संत रामानंदानी त्यांना शिष्य बनवलं. संत कबीर आणि रोहिदास हे समकालीन गुरुभाऊ होते. दोघांचेही गुरु रामानंद आहेत. स्वतः कबीरांनी ‘संतन मे रविदास’ अशी रोहिदासांना मान्यता दिली आहे. संत मीराबाई यांनी स्वतः त्यांच्या एका अभंगात रोहिदासांना गुरु मानत असल्याचे सांगितलं आहे. त्यावेळच्या सवर्ण समाजातील स्त्री रोहिदासांना गुरु मानते ही खूप मोठी गोष्ट आहे. यावरून रोहिदासांचे विचार जात, धर्म या पलीकडे जाऊन सगळ्यांना आकर्षित करत होते हे लक्षात येईल.

बहुतेक विद्वानांचा असा विश्वास आहे की रोहिदास शीखधर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांना भेटले. त्यांचा शीख धर्मग्रंथात आदर आहे आणि रविदासांच्या ४१ कवितांचा शिखांचा प्रमुख धर्मग्रंथ ग्रंथसाहिबा मध्ये समावेश आहे. या कविता त्यांच्या कल्पना आणि साहित्यिक कामांचे सर्वात जुने प्रमाणित स्त्रोत आहेत. रोहिदासांच्या जीवनाबद्दल आख्यायिका आणि कथांचा आणखी एक महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे शीख परंपरेतील प्रेमलेखन म्हणजे प्रेमबोध. १६९३ मध्ये रविदास यांच्या मृत्यूनंतर १५० वर्षांहून अधिक काळ रचलेल्या या मजकूरामध्ये भारतीय धार्मिक परंपरेतील प्रमुख सतरा संतांपैकी एक म्हणून त्यांचा समावेश आहे.

‘मन चंगा तो कठौती में गंगा‘ मन शुद्ध असेल आणि त्याला जातीवादाचा स्पर्श नसेल तर चांभाराच्या कुंडातही गंगाजलसारखं पावित्र्य दिसेल. रोहिदासांचा हा विचार कधीच जुना होणार नाही. यातून रोहिदासांच्या विचारांची व्यापकता किती होती याचा अंदाज घ्या. रोहिदास त्यांचे विचार हे दैनंदिन रोजच्या शब्दातून मांडायचे त्यामुळे सामान्य लोकांना त्यांचे विचार पटायचे. याच कारणांमुळे त्यांचे विचार उत्तर आणि दक्षिण दोन्ही भारतात सहज पोहचले. विषमतेमुळे देशाचे नुकसान होत आहे त्यामुळे रोहिदासांनी एकीचा संदेश दिला. रविदासांच्या विचारधारेत मनुष्य हा केंद्रबिंदू आहे त्यामुळे कर्मकांडांना त्यांनी साफ नाकारले. रोहिदास अध्यात्मिक नक्कीच होते पण कोणत्याही अंधश्रद्धेला ते बळी पडले नाहीत. त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि समाजात एकी निर्माण व्हावी हेच विचार त्यांनी आयुष्यभर मांडले. शेवट रोहिदास म्हणतात सर्व लहान मोठ्याना अन्न, वस्र, निवारा सम प्रमाणात मिळाला तर मी प्रसन्न होईल. संत रोहिदासांच्या स्वनातील आदर्श समाज त्यांनी खालील दोह्यातून मांडला आहे.

‘ऐसा चाहूं राज मैं, जहां मिले सबन को अन्न,
छोट-बड़ो सब सम बसे, रविदास रहे प्रसन्न ।

हे पण वाचा

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.