बप्पी लाहिरी हे मनोरंजन विश्व आणि चाहत्यांमध्ये ‘बप्पी दा’ या नावाने लोकप्रिय होते आणि ते याच नावाने चाहत्यांच्या हृदयात ते कायम राहतील. बप्पी दा ने भारतीय संगीताला काळाच्या पुढे नेऊन ठेवलं. डिस्को, पॉप अशा पाश्चात्य संगीताची ओळख बप्पीदाने करून दिली. डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली. बप्पीदाचे खरे नाव अलोकेश लाहिरी होते. बप्पीदा चित्रपटसृष्टीत आपल्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जातात. सदैव अंगावर सोन्याचे दागिने असलेला संगीतकार म्हणून त्यांची ओळख आहे. बप्पीदाच्या गळ्यातील सोन्याकडे बघून अनेकांना प्रश्न पडायचा बप्पीदा इतका सोनं का घालत असेल? पण याची पण मजेशीर कहाणी आहे.
बप्पीदाला सोन्याचे दागिने घालायला आवडतात कारण तो सोन्याला आपले नशीब मानतो. त्यामुळेच बप्पीदाच्या अंगावर अनेक दागिने दिसतात. गळा आणि हात नेहमी दागिन्यांनी भरलेले दिसतात. बप्पी लाहिरी इतके दागिने का घालतात याचं उत्तर अनेक मुलाखतींमध्ये दिलं आहे. अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेस्लीकडून बप्पीदाला दागिने घालायची प्रेरणा मिळाली. बप्पीदा असं म्हणतो कि,
हॉलीवूडचा गायक एल्विस प्रेस्ली सोन्याची साखळी घालायचा आणि मला तो खूप आवडायचा. त्यावेळेस मला वाटायचे की मी एक यशस्वी व्यक्ती झाल्यावर यासारखीच वेगळी प्रतिमा तयार करेन आणि त्यानंतर मी इतके सोने घालू लागलो. सोने माझ्यासाठी भाग्यवान आहे.
बप्पी दा चे सोने बघून अनेकांना वाटायचं बप्पी दा कडे लय सोनं असणार. बप्पीदाने कधी जाहीररित्या सांगितलं नव्हतं कि त्याच्याकडे किती सोनं आहे. पण २०१४ ला लोकसभेचा अर्ज भरताना प्रतिज्ञा पत्रात बप्पीदाकडे असलेल्या सोन्याचा तपशील दिला आहे. बप्पी लाहिरी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार २०१४ मध्ये बप्पी लाहिरी यांच्याकडे ७५४ ग्रॅम सोने आणि ४.६२ किलो चांदी होती. केवळ बप्पी दा नाही तर त्यांची पत्नी चित्रानीलाही सोन्याची आवड आहे. २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार बप्पी लाहिरी यांच्या पत्नीकडे ९६७ ग्रॅम सोने, ८.९ किलो चांदी आणि चार लाख किमतीचे हिरे आहेत. त्याच वेळी त्यांच्याकडे सुमारे २० कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या या मालमत्तेत आता बदल झाला असेल.
गायक आणि संगीतकार बप्पी दा
बप्पी लहिरी यांना जन्मापासूनच संगीताचे शिक्षण मिळाले. बप्पी लहिरी यांचे वडील अपरेश लाहिरी हे बंगाली गायक होते. त्यांची आई बन्सरी लाहिरी या संगीतकार होत्या. त्यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. तीन वर्षांचा असताना ते तबला वाजवायला शिकले. वयाच्या चौथ्या वर्षीच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गाण्यासाठी तबला वाजवला होता. यामुळे त्यांना ‘मास्टर बप्पी’ ही ओळख मिळाली. तेच त्यांचे व्यावसायिक नांव बनले. वयाच्या १९ व्या वर्षी मुंबईत आल्यानंतर बप्पी लाहिरी यांना पहिला ब्रेक १९७२ मध्ये आलेल्या बंगाली चित्रपट ‘दादू’ मध्ये मिळाला. नंतर त्यांनी १९७३ मध्ये आलेल्या शिकारी चित्रपटासाठी संगीत दिले. बप्पी लाहिरी यांनी ७० च्या दशकात चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि ८० च्या दशकात त्यांनी वर्चस्व निर्माण केले. प्रत्येक चित्रपटात गाण्यासाठी बप्पी दा निर्मात्यांची पहिली पसंती असायचा. १९७५ मध्ये आलेल्या ‘जख्मी’ चित्रपटातून बप्पी दा ला ओळख मिळाली. १९८० आणि ९०च्या दशकात बप्पी लाहिरी यांनी अनेक जबरदस्त साउंड ट्रॅक बनवले, ज्यामध्ये वारदत, डिस्को डान्सर, नमक हलाल, डान्स डान्स, कमांडो, गँग लीडर, शराबी यांसारख्या चित्रपटांचा समावेश होता. बप्पी दा यांनी गायलेली ‘बंबई से आया मेरा दोस्त, आई एम ए डिस्को डांसर, जूबी-जूबी, याद आ रहा है तेरा प्यार, यार बिना चैन कहां रे, तम्मा तम्मा लोगे ही गाणी आजही लोकांच्या ओठावर रेंगाळतात. बप्पी लाहिरींनी डिस्को नृत्यांना दिलेल्या चालींमुळे ते डिस्को किंग म्हणूनही ओळखले जातात.
२०११ मध्ये त्यांनी विद्या बालनच्या ‘डर्टी पिक्चर’ मध्ये ‘ऊ लाला ऊ लाला’हे गाणे गायले जे सुपरहिट ठरले. या गाण्याने बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा सनसनाटी निर्माण केली. बप्पी दा यांच्या संगीत शैलीचे सर्वांनीच कौतुक केले. एका दिवसात सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्याचे श्रेयही बप्पी दा यांना जाते. बप्पी लाहिरींनी जितकी डिस्को गाणी बनवली, त्यापेक्षा अधिक भजने ध्वनिमुद्रित केलेली आहेत. त्यांची गणेश आराधनेची गीते खूप लोकप्रिय झाली होती. किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सन देखील बप्पी दा यांच्या संगीत शैलीने प्रभावित झाला होता. मायकल जॅक्सनने बप्पी दा यांना मुंबईत झालेल्या शोमध्ये आमंत्रित केले होते. त्यांनी भारतीय चित्रपटात सिंथेसाईज डिस्को संगीताचा वापर लोकप्रिय केला.
२०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी 3 चित्रपटात ‘भंकस’ नावाचे शेवटचे बॉलिवूड गाणे गायले. ४५ वर्षांच्या आपल्या चित्रपट कारकिर्दीत बप्पी दा यांनी ५०० हून अधिक चित्रपटांसाठी गाणी रेकॉर्ड केली आहेत. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कारही मिळाला आहे. राजकारणाच्या दुनियेतही हात आजमावण्यात बप्पी दा मागे राहिले नाहीत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला. बप्पी दा यांना त्यांना दोन मुले आहेत. बप्पी दा यांच्या जाण्याने एका महान गायक आणि संगीतकाराला आपण गमावले आहे.
हे पण वाचा
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !