MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

असा चित्रपट पहिला कि इरफान अजून आपल्यात जाणवतो.

एकटेपणा आजच्या जगात कदाचित शाप असू शकतो

पण हो, हा एकटेपणा एखाद्याची आवड-निवड पण असू शकते. जगात तुमचं कोणी नसताना आलेलं एकटेपण आणि तुमची माणसं जवळ असताना अगदी रक्ताची म्हणतो तशी नाती आसपास असतानासुद्धा जाणवलेले एकटेपण, दोन्हीही नैराश्याच्या स्वागतासाठी तयारच असतं. ईला आणि साजन यांच्या एकटेपणा व्यतिरिक्त तिसरा एक एकटेपणा मांडला आहे, तो म्हणजे इलाच्या घराच्या वरच कोमात गेलेल्या नवऱ्यासोबत राहणाऱ्या आंटीचे एकटेपण. अगदी तसच ईलाच्या आजारी बापाची शुश्रुषा करणारी ईलाची आई तिच्या नशिबी आलेला असाह्य एकटेपणा. या सगळ्या माणसांच्या आयुष्यात संघर्ष चालू आहे. ईला आणि साजनच्या संवादाद्वारे चित्रपटात निराश परीस्थितीत एकटेपणावर थोड्याशा आशा पल्लवित करून भाष्य केलं आहे.

बऱ्याच गोष्टींचा उलघडा खूप बारकाव्याने लक्ष देऊन समजून घ्यावा लागतो

या चित्रपटात घडणाऱ्या घटना आणि संवादातील एकेक वाक्य त्या पात्राच्या आयुष्याचा नेमका अर्थ लगेच कळत नाही. बऱ्याच गोष्टींचा उलघडा खूप बारकाव्याने लक्ष देऊन समजून घ्यावा लागतो. त्यामुळे घटना नजरेसमोरून जलद पळवणार्याला हा चित्रपट कंटाळा आणू शकतो. हॉलिवूडमध्ये shawshank redemption नावाच्या चित्रपटात आयुष्याच्या शेवटी जेलमधून सुटलेल्या कैद्याला जेलच्या बाहेरचं सर्वसाधारण आयुष्य जगणं अवघड जातं, म्हणून तो आत्महत्या करतो. असाच प्रसंग चित्रपटात गंमतीने मांडला आहे. आंटीचा कोमात असलेला नवरा कित्येक वर्षांपासून फिरणाऱ्या पंख्याकडे बघत राहतो. तो पंखा कधीच बंद पडू नये म्हणून ती आंटी जनरेटर घेते. साजन फर्नांडिस ( इरफान खान) यावर गमतीने प्रतिक्रिया देतो, जर आज ऑंटीचा नवरा पुन्हा बरा झाला तर शहरातील गर्दी बघून परत खुशीने कोमात जाईन. एखाद्या माणसासमोर ठराविक घटनाच वर्षानुवर्षे घडत आहेत. त्याच्या दृष्टीने तेवढेच आयुष्य ठरवलं असेल तर चार भिंती मधला परिसर हेच त्याच्या सोयीचं आणि सवयीचं जग होईल. आणि तोच माणूस मोकळ्या रस्त्यांवर फिरायला लागला तर त्याला कदाचित मोकळेपणा असाह्य होईल किंवा चार भिंतीत वर्षानुवर्षे न दिसलेल्या गोष्टी बघून भीती वाटेल.

दिवसभर बोलायला कुणीच नसतं अशावेळी मनात खूप काही साठलेलं असतं.

डबे वाल्याकडून चुकून ईलाचा डबा नवऱ्याच्या ऐवजी साजनकडे जातो. दुसऱ्या टप्प्यानंतर त्यांचा संवाद लगेच सुरू होतो. ईला त्याला सहजपणे तिच्या आयुष्याबद्दल सांगायला लागते. इतक्या लवकर अनोळखी माणसाशी ती कसं काय बोलायला लागते हा प्रश्न पडू शकतो. तेही त्या माणसाला पाहिलेलं नसताना. घरी पोहोचलेला मोकळा जेवणाचा डबा, कोणीतरी माणूस आहे या विश्वासावर तो फसवणार नाही हा विचार न करता त्याच्याशी ती बोलते. दिवसभर बोलायला कुणीच नसतं अशावेळी मनात खूप काही साठलेलं असतं. कामावरून येणारा नवरा त्याच्या समोर मन मोकळं करावं तर तोही दुर्लक्ष करतोय. अशावेळी कोणीतरी ऐकून घेणारा तिला जाणवतोय. त्याच्यासमोर ती मन मोकळं करायला लाजत नाही किंवा विचार करत नाही कारण मन व्यक्त व्हायला अधीर झालेलं असतं. म्हणून मग अनोळखी माणसांशी संवाद सहाजिकच पटकन होतो.

‘ दिल का रास्ता पेट से होकर जाता है ‘

दिल का रास्ता पेट से होकर जाता है ‘ या आशेवर ती नवऱ्यासाठी स्वयंपाक खूप प्रेमाने बनवत होती. पण तिला हे उशिरा कळलं की पोट योग्य माणसाच असलं तरच तो मार्ग मनापर्यंत जातो. नाहीतर फक्त पोटाची भूक भागते, असं समजून खाणाऱ्यांना मनाची भूक कळून येत नाही. अशा माणसांचं प्रेम कोरडच राहतं. ईलाच्या नवर्याने प्रेमाने संवाद करून आपुलकीचा ओलावा तिला कधीही अनुभवू दिला नाही. साजन आणि तिचा पत्रव्यवहारामधला संवाद एकमेकांना ऐकून घेणारा होता. आहे त्या परिस्थितीत हा संवाद प्रत्येक पुढची चिठ्ठी हातात येईपर्यंत सुखावणारा होता. चिट्ठी वाचताना जवळ आल्याची गोड भावना रोज हवीशी वाटत होती. बायको गेल्यापासून साजनसाठी गर्दीत वावर मेल्या सारखाच वाटत होता. त्यात साजनसाठी ईलाचं पत्र वाचण्याचा अनुभव जगण्याचं नवीन स्फुलिंग देणारा होता. आयुष्याची गंमत संपली असं मानणाऱ्या माणसाच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आलं तर तो चेहरा वास्तविक कसा खुलेल हे इरफानचा अभिनय पाहून कळेल.

सुखापासून लांब असणाऱ्या लोकांना सुखाच आकर्षण जगातली सुखी ठिकाणं नजरेसमोर बरोबर आणून ठेवतो.

एरव्ही जीडीपीच तीला काही पडलेलं नसणार. पण भूतानमध्ये जीडीपीच्या ऐवजी ग्रॉस नॅशनल हॅपिनेस मोजला जातो याचं तिला कौतुक आणि आकर्षण वाटत. शक्य झालं तर भूतानलाच जाऊ अशी स्वप्न पाहू लागते. हे तिनं साजनला सांगितलं. इथून पुढे साजन आणि ईला विश्वासाने एकमेकांमध्ये जास्त गुंतले जातात. ही भावनांची गुंतागुंत भेटूनच सुटसुटीत करावी आणि जमलं तर नवीन गाठ बांधावी या हेतूने ते भेटायचं ठरवतात. उत्सुक साजन सकाळपासूनच तयारी करत असतो. तीही उत्सुकतेत वेळेच्या अगोदर पोहोचलेली असते. या भेटीत पुढच्या आयुष्याबद्दल अनेक प्रश्नांची उत्तर लपलेली असतात. साजन तिथे जातो पण तिला भेटत नाही. लांबून तिला पाहत राहतो. वय वाढल्याची जाणीव तिच्यासमोर जाऊन बसायचं धाडस देत नव्हती. एका तरुण सुंदर मुलीसमोर स्वतःला अपराधी वाटू लागलं. समाजाच्या चौकटीत हे प्रेम बसणार नाही म्हणून न भेटताच तो तिथून निघून गेला.

नैतिकतेचा टेंभा मिरवणाऱ्या समाजात नेहमी ठराविक लोकांच्या सोयीनुसारच नैतिकता ठरवली जाते.

नैतिकता माणसाच्या सुखाशी बांधील नसून लोकांना नियंत्रित करण्यासाठी दिखाऊ बांधीलकी आहे. म्हणून तर समाजमान्य नैतिकतेत नवऱ्यासोबत जगणारी ईला हिचा सुखाशी कधी संबंध आला नाही. पत्नी असताना विवाहबाह्य संबंध ठेवणारा ईलाचा नवरा केवळ स्वतःच्या सुखाशी प्रामाणिक आहे. ईलाला दुःखी ठेवणं त्याला अनैतिक वाटत नाही. म्हणजे एकूण आपल्या समाजात सुख मिळेल की नाही ही खात्री नसताना अधांतरी भरोशावर समाजमान्य नियमानुसार आपण नाती जोडतो. आणि जिथं सुख मिळायची किमान प्राथमिक खात्री असतानासुद्धा समाजमान्य नियम आडवे येतात म्हणून आपण नाती तोडतो.

एकूण हिशोब केला तर समाज दुःख आणि एकटेपणा भीषण अनुभवतोय. पण कागदोपत्री याचा ठोकताळा करता येणार नाही करण भावनिक नुकसान मोजण्याचं परिमाण आपल्याकडे नाही. एकटा असलेला साजन सोबतीचा भास घेऊन काही दिवस का होईना स्वप्नात रमला त्यासाठी त्याने ईलाचे आभार पण मानले. आणि पुन्हा विरहाच्या दुःखात स्वतःला बुडवून गेला. सगळं सोडून तो नाशिकला जायच्या तयारीत निघाला. रेल्वेमध्ये बसल्यावर त्याच्यासमोर एक वयस्कर माणूस त्याच्याशी बोलायला लागतो. हा वृद्ध त्याच्या मुलांना भेटायला मुंबईला आलेला असतो. मुलं असूनही तो वृद्ध त्यांच्यापासून दूर एकटाच राहत असतो. नाती आपली वाटत असली तरी ती समजून घेणारी असतील तरच तुम्हाला सोबत देत असतात. अन्यथा तुमचं या जगात कोणी असो वा नसो सारखंच आहे. हे साजनला जाणवतं. तुमच्या नैसर्गिक भावनेला समाजमान्य नैतिकता फार काळ रोखू शकत नाही.

या नैसर्गिक भावनांना तुम्ही बाहेरून कोणी धक्का देण्याची वाट बघत असता आणि शेवटी सगळं झुगारून स्वतःलाच न्याय देण्यासाठी सज्ज होता. साजनचं तेच झालं. ईलाचा पत्ता शोधण्यासाठी तो डबेवाल्यांकडे चौकशी करू लागला. याआधीच साजनच्या कार्यालयात जाऊन ईलाने त्याची चौकशी केली होती. साजनने काम सोडलं होतं तोपर्यंत. ईला दागिने विकून भुतानला जायचं ठरवते. असा अपूर्ण चित्रपटाचा शेवट होतो. पुढे त्यांची भेट होईल का नाही हे स्पष्ट होत नाही. अनेक शक्यतांचा विचार करायला दिग्दर्शक आणि लेखक तुम्हाला भाग पाडतो. अशा कथांचा हॅप्पी इंडिंग का होत नाही हा प्रश्न तुमच्या समोर ठेवला जातो. नेहमी हॅप्पी इंडिंग करण्याइतकी प्रत्येक पात्राच्या आयुष्यात अनुकूल परिस्थिती असेल ही खूप आदर्शवत अपेक्षा झाली. ही कथा वास्तविक परिस्थितीत पात्रांच्या आयुष्याचा अंदाज घेऊन मांडली आहे. म्हणून कथा पुढे सरकताना आशावादी आणि निराशावादी दोन्ही घटकांचा परिणाम पात्रांच्या आयुष्यावर दिसून येतो. म्हणून प्रेक्षकांनी सुद्धा याच भान ठेवून शेवट आपापल्या आकलनानुसार करावा ही अपेक्षा असावी.

माहितीपटासारखं या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.

म्हणून भरगाव धावणार संगीत यात नाही. कथा वास्तविक वाटावी असं शेवटपर्यंत भान ठेवून चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. साजन सोबत जेवताना त्याचा कनिष्ठ सहकारी शेख रोज दोन केळी आणि एखाद दुसरं फळ घेऊन येत असतो. दुपारचं जेवण म्हणजे इतकाच त्याचा आहार ठरलेला असतो. मुंबईमधल्या हजारो कामगार रोज एका वेळेला केळी खाऊन जगतात. ही परिस्थिती शेवटपर्यंत तुमच्या नजरेसमोरून दूर होऊ दिली नाही. मुंबईतल्या धकाधकीची सवय झालेल्या साजनला आयुष्याबद्दल मात्र तो समाधानी नाही किंवा त्या धकाधकीशी तो अजून एकरूप झालेला नाही. शेख मात्र मुंबईच्या जगण्याशी जुळून घेतलेला नमुनेदार मुंबईकर नवाजुद्दीनने हुबेहूब साकारला आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि छायाचित्रण सगळ उत्तम आहे. तरी एक गोष्ट चित्रपटात खटकत आहे. शेवटपर्यंत लंचबॉक्स मधल्या कागदावरच त्या दोघांचं संभाषण अवलंबून राहिलं. चित्रपटातून नेमका काळ लक्षात येत नाही. संपर्कासाठी मोबाईल दिसत नाही. पण इलाच्या घरी मात्र दूरध्वनी ( टेलिफोन) दाखवला आहे. त्याच दूरध्वनीवर आईचा फोन येतो म्हणून तिला तिचे वडील गेल्याचं कळतं.

मग प्रश्न असा पडतो की ही सुविधा असतानाही तिनं त्याला संपर्क क्रमांक का दिला नाही, किंवा त्याने पण का मागितला नाही? अशा काही थोड्याफार चुका असल्या तरी एकूण चित्रपटाचा सार किंवा गाभा याचं महत्त्व अजिबात कमी होत नाही. कौटुंबिक समस्यांकडे सामाजिक समस्या म्हणून बघता आलं पाहिजे. कारण कुटुंबात होणारे कलह सामजिक परिस्थितीतून आलेले असतात हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून हा चित्रपट पाहताना केवळ दोन तीन व्यक्ती सापेक्ष कथा नसून समाज सापेक्ष विषय आहे हे समजून घेतलं पाहिजे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.