क्रिस्टोफर नोलन हा जगातील एकमेव दिग्दर्शक असावा जो एक चित्रपट बनवायला कमीत कमी अडीच वर्षे वेळ घेतो. बरं मजा येते म्हणून हा वेळ घेत नाही. तर या माणसाला कोणताही चित्रपट बनवताना इतक्या बारकाव्याने चित्रपट बनवतो कि प्रेक्षक म्हणून चित्रपट बघताना आपल्या डोक्याचा भुगा होतो. पिक्चर बघायला जायचं असेल तर अभ्यास करून जावं लागतं. याचा शेवटचा चित्रपट टिनट हा एक Sci-fi चित्रपट होता. वेळ कोणाच्या हातात नाही म्हणतात पण या चित्रपटात याने वेळ पकडून ठेवला होता. एका काळातून दुसऱ्या काळात जायचं असा काही तरी विषय होता. पिक्चर बघून आल्यावर नेमकी संकल्पना काय होती हे अभ्यास करावं लागलं होतं. याचा गाजलेला अजून एक चित्रपट म्हणजे इन्सेप्शन. या मध्ये तर तो लोकांचे स्वप्न सुद्धा नियंत्रित करत होता. हा पिक्चर पण दोनदा बघावा लागतो तेव्हाच कळतो. असं नाही कि फक्त विज्ञान घेऊन पिक्चर बनवतो. बॅट मॅनच्या सिरीज मधील आतापर्यंत सगळयात गाजेलला ‘द डार्क नाइट’ चित्रपट नोलनेच बनवला आहे. यातला जोकर अजून पण कित्येक लोकांच्या कव्हर पेजवर दिसेल. एकेक पात्र, सिन निर्माण करत असताना हा प्रचंड मेहनत घेतो त्यामुळे याचा प्रत्येक चित्रपट हा चित्रपट क्षेत्रातील लोकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. प्रत्येक चित्रपट तयार होत असताना अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी बाहेर येतात तसाच हा एक किस्सा आहे, फक्त एका सीनसाठी क्रिस्टोफर नोलनने ५०० एकर मका लावली होती.
हा किस्सा आहे Interstellar हा चित्रपट तयार होत असतानाचा. आधीच सांगितल्याप्रमाणे नोलन कोणताही चित्रपट बनवताना अतिशय बारकावे तपासतो. नोलनला एका सीनसाठी लांबवर हिरवीगार शेती पाहिजे होती. एक सीनमध्ये या शेतातून एक गाडी जाताना दाखवली जाणार होती. युट्यूब वर हा सीन तुम्ही बघू शकता. क्रिस्टोफर नोलनला हा सगळा सीन कृत्रिमरित्या तयार केलेला नको होता. VFX किंवा इतर तंत्राने सहजरित्या हा सीन तयार करता आला असता पण नोलनचे यामुळे समाधान झाले असते तर क्रिस्टोफर नोलन कसला ? असा दिग्दर्शक असतो हेच कित्येक लोकांना पटणार नाही. त्याने ठरवलं सीन तर पूर्ण वास्तव शूट करायचा. नोलनने चक्क ५०० एकर शेतीत मका लावायला सांगितली. स्वतः या शेतीकडे लक्ष दिले. जेव्हा ही शेती पूर्ण फुलली तेव्हा त्याने शेतातून गाडी जाणारा सीन शूट केला. ५०० एकरातून काढलेला हा सीन एकदम वास्तव दिसतो. चित्रपटाची शूटींग पूर्ण झाली मग मक्याचं करायचं काय हा प्रश्न होताच.
एका सीनसाठी एवढी मेहनत घ्यायची काय गरज असं एखाद्याला वाटू शकतं. पण काय आहे ना मेहनत वाया जात नाही. पिक्चर आला तेव्हा नोलनचा चित्रपट म्हणून लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. कित्येक लोकांनी चित्रपटावर चर्चा सत्र भरवले. मला अजून यातल्या काही गोष्टी लक्षात आल्या नाहीत. चित्रपटाची स्टोरी थोडक्यात पुढं सांगतो पण याआधी या ५०० एकरातील मक्याचं काय केलं हे समजून घ्या. नोलनने ही मका विकली आणि आलेल्या पैशाला चित्रपटाच्या नफ्यात जोडलं. मका लावली त्या खर्चापेक्षा चांगले उत्पन्न आले. एका सीनसाठी ५०० एकरातील मका वाया जाईल असं सगळ्यांना वाटत होतं, पण उलट फायदाच झाला.
Interstellar बघितला पाहिजे का ?
विज्ञान आवडत असेल तर मग उशीर करू नका बघायला. हा पिक्चर नीट समजला तरी PhD केल्यासारखं वाटेल. पृथ्वीवर राहण्यासारखी परिस्थिती नाही म्हणून काही जणांना अंतराळात राहण्यासारखी दुसरी जागा आहे का हे पाहण्यासाठी पाठवलं जातं. एक तुकडी तुकडी आधीच पाठवली असते त्याचा ही शोध घ्यायचा असतो. या शोध मोहिमेत ते अशा ग्रहावर पोहचतात जिथे एक तास थांबले तर पृथ्वीवर ७ तास होतात. वेळ ही कल्पना कशी बदलते हे चित्रपटात बघा. आपला हिरो अंतराळात इतका काळ घालवतो कि पृथ्वीवर परत येईपर्यंत तो सोडून सगळे वयस्कर झालेले असतात किंवा मेलेले असतात. वेळेचं हे अवघड गणित वैज्ञानिक दृष्टीने मांडलं आहे. समजलं तर चांगली मजा येईल चित्रपट बघायला. अनके कल्पना डोक्यावरून जातील तरी समजून घेण्याचा प्रयत्न करा. क्रिस्टोफर नोलन चित्रपट बनवतो त्यापेक्षा अभ्यासाला लावून जातो असं वाटल्याशिवाय राहणार नाही.
हे पण वाचलं पाहिजे
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?