प्रिय,
तुकाराम मुंढे सर,
संत तुकारामांनंतर “तुकाराम” नावाला शोभिवंत असं काम करणारं दुसरा कुणी अवलिया दिसलाच नाही आत्तापर्यंत ! तुकारामांनी आपल्या स्वःतच्या आयुष्याच उगाच रणकंदन करून घेतल नाही. चांगली सावकारी करून गरिबांच शोषण करतं मस्त आयुष्य जगता आलं असतं त्यांना ! समोरच्या अनेक पिढ्याही सुखात गेल्या असत्या. पण व्यवस्थेला हादरे देत त्यांनी बदल घडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. आपला पांडुरंग त्यात शोधला. म्हणून तर “तुका” आज आभाळायेवढा झाला आहे. तोच “तुका” प्रशासनातही तुमच्या रुपात मला दिसला.
हेच पत्रास कारण.
लाखो विद्यार्थी दर वर्षी लोकसेवा आयोगाची परिक्षा देत असतात. हजारो विद्यार्थी आज अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. आपली आयुष्याची उमेदीची वर्षही त्यासाठी देतात आणि काही अधिकारीही होतात. अधिकारी झाल्यावर मात्र सुखावून जातात. सत्कार समारंभाच्या शालींची उबच त्यांना हवीशी वाटते. अनेक विद्यार्थी गरिबी आणि हलाखीच्या परिस्थितीतही रात्रं-दिवस आभ्यास करतात. निवड झाल्यावर कित्ती कष्ट घेतले याचा पाढा आपल्या भाषणांतून सांगितला जातोच. आपण घेतलेली मेहनत आणि त्याला आलेल गोड फळ जगाला अभिमानानं दाखवायला काहीच हरकत नाही. अपयशातून खचलेल्यांना पुन्हा लढण्याची उमेद मिळते आणि अनेकांसमोर आदर्श घडवला जावू शकतो. त्यातून स्फुर्ती घेता येवू शकते. त्याबाबत काहीही दुमत नाही. पण जेंव्हा नुकतेच अधिकारी झालेल्या साहेबांना मोठं-मोठी नेतेमंडळी लग्नासाठी मागण्या घालायला लागतात आणि ह्या मागण्यांचा मोठ्या तोऱ्यात स्विकार जिथं होतो तिथंच लोकसेवेचा उद्देश खरं तर संपून जातो असं वाटतं. महारष्ट्राच्या अनेक भागात भरमसाट हुंडाच्या चाली अजूनही रूढ आहेत . जेवढा जास्त हुंडा घेतला जातो तेवढी समाजात प्रतिष्ठा अजून वाढते. मोठ्या थाटात पार पडणाऱ्या लग्नाला नेते मंडळींची हजेरी पाहून ते लग्न नसून एखाद्या पक्षाचा मेळावा वाटतो. त्या झगमगाटात आई -वडिलांची मान अजून उंचावते वैगरे. लगेच त्यांचा आदर्श घेऊन आमच्या गावा-गावतली बारावी किंवा डिग्री झालेली मुले डोळ्यांत तिचं स्वप्न साठवत दिल्ली-मुंबई-पुणेहीे गाठतात. त्यांना फक्त ही प्रसिद्धी, प्रतिष्ठा, जिवनपद्धती काहीही करून जगायची असते. त्यासाठी सर्व उठाठेवी चाललेल्या असतात. आपल्या प्रामाणिक कष्टाच्या जोरावर हालाखीच्या चटक्यांची दाहकता झेलत अनेक जनं ही पद पादाक्रांत करतात. आणि पुन्हा तेचं पद, वर कमाई, पैसा, मोठा विवाह, प्रतिष्ठा, ई. गोष्टी. आणि लोकसेवा फक्त नाममात्र राहते. त्यामुळं समाजाची जगण्याची आणि ऐकमेकांकडं बघण्याची दृष्टीही बदलून जाते. मुल्य हरवतात आणि हरवलेल्या मुल्यांमुळे समाजही हरवून जातो.
सर तुम्ही मात्र हे चक्र तोडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सांगीतलत की “पहिल्यांदा आपलं ध्येय निश्चित करा. मग भलेही ते डॉक्टर, इंजिनियर, व्यापारी किंवा चहावाला. पण त्यातून तुम्हाला सर्वस्वी समाधान मिळायला हवंय. समजा तुम्हाला भयंकर थकवा आलेला आहे तरीही तुम्ही ते काम उत्साहानं करू शकाल असं काही निश्चित करा आणि त्या दृष्ठीनं मार्गक्रमण करा. ज्यांना पैसा कमवायचा त्यांनी स्पर्धापरिक्षांकडे फिरकूपण नका. पैसे कमावण्यासाठी दुसरे खूप पर्याय उपलब्ध आहेत. प्रामाणिक काम करायच असेल तरच लोकसेवेकडे वळा.” असं स्पष्टपणे सांगणारे तुम्हीच खरे तुकाराम नावास साजेशे असे. लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केल्यावर त्यात तुम्ही किती आभ्यास केला आणि मग कशा खडतर परिस्थितीत कस यश मिळवलंत हे गेली पंधरा-वीस वर्ष तुम्ही सांगत बसला नाहीत. फक्त आपलं काम कर्तव्यतेने पार पाडलंत. प्रशाकीय सेवेत खऱ्या सेवेच पान जोडलंत.
सर, तुम्ही तुमच्या यशाचं भांडवल केलं असतं तरी आम्हाला काहीच वाटल नसतं. कारण सांगणारे खूप आहेत आम्ही घेतोच कि त्यांना डोक्यावर. पण स्वतःला आणि कुटुंबाला कितीही त्रास झाला तरी आपल्या तत्त्वाशी तसूभरही तडजोड नाही, कितीही बदल्या झाल्या असताना, अनेक कठीण प्रसंगांना सामना करताना तुम्ही ढळला नाहीत. मेरू पर्वतासारखी आपली तत्त्व तुम्ही तशीच जपून ठेवलीयत. यामुळेच तुम्ही बाकीच्या अनेक वर्ष आपल्या यशाची रटाळ शिडी वारंवार वाचून दाखवणाऱ्यां पेक्षा खरे आदर्श अधिकारी आहात. कृतीतून ठसलेल तत्वज्ञान नक्कीच तुमच्यासारखेच प्रामाणिक, कार्यक्षम आणि लोकसेवक अधिकारी घडवण्याचा आदर्श निर्माण करतं आहेत. “बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले” म्हणून आजच्या देशातल्या फक्त स्पर्धा परिक्षांतच नाही तर इतरही क्षेत्रांतही लोकांना तुमच्यासारखचं होवू पहायचं आहे. काही वर्षांपुर्वी प्रशासनात जाऊन प्रामाणिक काम करताच येतं नाही असं सांगितल जायचं. राजकारणी खूप त्रास देतात आणि शेवटी आपल्याला त्यांच्यासमोर झुकायला लागतं असं काही सांगितल जायचं. पण आज तुमचं त्रास झाला तरी नियमानुसार सर्वांसाठी समान काम पाहिलं की वाटतं भारत खरंच लोकंशाही देश आहे. तुमचा आदर्श घेऊनच अनेक मुलं “तुकाराम मुंढे” होऊ पाहत आहेत. मान्य आहे सगळे अधिकारी होऊ शकणार नाहीत. पण आपापल्या क्षेत्रातला तुकाराम तर नक्कीच होतील.
कदाचित याच आदर्शतेतून आदर्श असे राजकारणीही घडतील आणि “आपलं पद हे फक्त मिरवण्यासाठी नसून सेवेचे धडे गिरवण्यासाठी असत.” याचा सर्व समाज स्विकार करेल. मग वाटणार नाही एखाद्या पित्याला की आपल्या मुलाने पैसा कमवावा टेबलाखालून ! उलट आपल्या मुलाच्या प्रामाणिकतेच्या बातम्याच त्यांच्या म्हातारपणाची काठी होऊन जगवेन त्यांना ! जगण्याच खरं समाधान असेल त्यात. व्यावसायीक होतं जाणाऱ्या आमच्या समाजाला अशा मुल्यांची खरंच खूप गरज आहे.
भारतात हजारो अधिकारी आहेत पण आम्हाला फक्त तुकाराम हवे आहेत. यावरून समाजात लोकशाही, शिस्त, नियम, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, समानता, ई. मुल्य सुप्त अवस्थेत आहेत हे दिसून येतं. फक्त प्रत्येक ऑफीसात त्यांना तुकाराम हवा आहे. राजहंसासारखा पाण्यापासून दुध वेगळं करणारा फक्त एक दूत हवा आहे.
तुकाराम सर, तुम्ही जिथे जाता तिथे भ्रष्टाचाऱ्यांना चपराक आणि कर्तव्यनिष्ठ प्रामाणिकांना खुशहाली आहात. तसूभरही गैर पचवून न घेणाऱ्या तुम्ही राजकारण्यांच्या पचनी तर सोडा पण अलीकड वचनीही पडताना दिसतं नाहीत. त्यामुळं सर्रास बदलीचं चुर्ण राजकारणी वापरतात. तुमची अग्निपरिक्षा तशीच सुरू आहे. सोन्याला जेवढं तापवाल तेवढं ते झळाळनारचं आहे. आज अवघ्या देशाला तुमचा अभिमान आहे. फक्त ह्या अभिमानाची सार्थकताही तरुणांनी करून घ्यावी हीच इच्छा.
तुकारामांच्या गाथा बुडवनारे अनेकजण होते पण तुकारामांना रोखण्याची ताकत त्यांच्यात तेंव्हाही नव्हती ती आजही नाही. तुकाराम आभाळा एवढा होता आणि तो तशाच राहावा हि इच्छा आहे । सर, तुम्हाला प्रदीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा !!!
तुमचाच चाहता.
करणकुमार पोले. परभणी.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?