पुणे मुंबई मध्ये मुख्य रस्त्यावर फिरकत असाल तर आसपास नजर टाका एखादं lenskart.com दुकान दिसतंच. भारतातील मुख्य शहरांमध्ये lenskart चा बोलबाला वाढला तो मागच्या पाच सहा वर्षांमध्ये. lenskart.com हे चष्मा विकणारे भारतातील अग्रेसर चष्माघर आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून तुम्ही चष्मे विकत घेऊ शकता. Lenskart जेव्हा सुरु झालं तेव्हा पुढच्या काही दिवसातच १५००+ शहरांमधील दररोज १००० लोकांना चष्मा आणि ५०० लोकांना त्यांच्या घरी नेत्र तपासणीची सुविधा देत होते. Lenskart ६०० कोटी उलाढाल असलेले देशातील सर्वात मोठे ऑनलाइन ऑप्टिकल स्टोअर आहे. संस्थापक पीयूष बन्सल यांचा हा प्रवास वाचायला आज मस्त वाटतोय पण त्याचा संघर्ष बघितला तर पेटून उठल्याशिवात राहणार नाही.
पियुष बन्सल हा तसा पुस्तकी किडा होता. सतत मेहनत करणे हे त्याच्या आयुष्याचा भाग होता. पुस्तकी माणसाला जग समजेल असं नसतं. पियुषला अजून दुनियादारी समजली नव्हती. IIT मध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून तो कॅनडाला अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी गेला. शिक्षण चालू असताना पियुष रिसेप्शनिस्टची नोकरी करू लागला. जिथे तो हे काम करायचा तिथेच त्याला कोडींगची आवड लागली. पियुष हुशार विद्यार्थी होता त्याने लवकरच सगळ्या गोष्टी आत्मसात करायला शिकून घेतलं. इथे त्याला ग्राहकांच्या स्वभावाची थोडी ओळख झाली. यामुळे ग्राहकांची खरेदीची मानसिकता समजायला लागली. यानंतर त्याने मायक्रोसॉफ्ट मध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज केला. मायक्रोसॉफ्ट पहिल्या प्रयत्नात त्याच्या हाती लागली नाही. पुढच्या वर्षी चांगल्या तयारीने त्याने पुन्हा अर्ज केला. चांगल्या तयारीच्या जोरावर त्याने मायक्रोसॉफ्टच्या दुनियेत प्रवेश मिळवला. मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्याचा अनुभव आयुष्य बदलून टाकणारा होता. पियुष या अगोदर जिथे काम करायचा तिथल्या अनुभवात आणि मायक्रोसॉफ्टच्या अनुभवात जमीन अस्मानचा फरक होता.
कोणतेही काम हे ग्राहकाला किती आणि कसे सोयीचे होईल यावर विचार करून जर तुम्ही ग्राहकाची अडचण दूर करू शकत असाल तर व्यवसायाला संधी निर्माण होईल हे पियुषच्या लक्षात आले होते. मायक्रोसॉफ्ट मध्ये ग्राहकांच्या गरजेला खूप महत्व दिले जाते. एकूण कामाच्या ५० टक्के वेळ ग्राहकांच्या अडचणी दूर करण्यात मायक्रोसॉफ्ट घालवते. आणि हेच त्यांच्या यशाचं गमक आहे हे पीयूषच्या लक्षात आलं. यानंतर पियुषने नोकरी सोडण्याचा विचार केला. पियुष घरी येतोय बघून घरच्यांना आनंद झाला पण चांगली नोकरी सोडून येतोय म्हणून चिंता पण वाढली. पियुष घरी आला खरे पण व्यवसाय काय करणार हे त्याला माहित नव्हतं. नोकरीतून कमावलेली काही संपत्ती होती पण ती पुरेशी नव्हती. पियुषने स्वतःच्या गॅरेजपासून कामाला सुरुवात केली. गॅरेजलाच ऑफिस बनवले. काही दिवसात पियुषला आणखी दोन जण येऊन मिळाले. पियुषाचे सर्व सहकारी जॉब सोडून आलेले होते. एकाला तर राहायला घर नव्हतं. पियुषने त्याच्या स्वतःच्या घरी त्याला ठेवलं आणि सुरु झाला lenskart चा प्रवास.
पियुषला तंत्रज्ञान आणि ग्राहकांची मानसिकता चांगलीच समजली होती. जगातील एकूण अंध लोकांपैकी ४० टक्के लोक हे भारतात राहतात. भारत हे चष्मा वापरणारे सर्वात मोठे मार्केट असेल असा पियुष आणि त्याच्या सहकाऱ्यां अभ्यास केला. ऑनलाईन चष्मे विकायला सुरुवात केली. पियुषने अजूनही एक दोन व्यवसाय सुरु केले होते पण त्यापैकी हा व्यवसाय जास्त मोठा होईल म्हणून पियुष आणि त्याच्या सहकाऱ्यांनी Lenskart वरती लक्ष केंद्रित केले. हा व्यवसाय मोठा होईल म्हणून गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक करायला सुरुवात केली. भांडवल वाढले तसा Lenskart चा व्याप वाढला. १२० पेक्षा अधिक शहरात ५०० पेक्षा अधिक दुकाने lenskart ची सध्या आहेत. Lenskart च्या दाव्यानुसार ५० लाख त्यांचे ग्राहक आहेत.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?