चार दिवसावर ऊस परिषद आहे यावर्षी कॅन्सल करू हि परिषद.
या नेत्याची पहिली ऊस परिषद. परिषदेची प्रचार प्रसाराची सभा चालू होती. हा शेतकरी नेता पुढे बसलेल्या शेतकऱ्यांना संबोधून बोलत होता. भाषण चालू असताना एकजण कानाशी येऊन काही तरी बोलला. समोर बसलेल्या लोकांना काही तरी गंभीर झाल्यासारखा जाणवतं होतं. या नेत्याने भाषण आवरतं घेतलं. निघायची गरबड केली. थेट हॉस्पिटल गाठलं. पोहोचल्याबरोबर डॉक्टर ने सगळं संपलं असं सांगितलं. ऐकून अंगातली सगळी ताकत एकदम निघून गेली. मोठा आधार हरवला होता. काल पर्यंत ज्याच्या विश्वासावर हा नेता लाखो लोकांसमोर उभा होता असा त्याचा सख्खा भाऊ आता जगात राहिला नव्हता. तो नेता एका क्षणात एकटा झाला. दुःखाचा एकेक क्षण हतबल आणि निराश करत राहिला. दुःख इतकं कवटाळून बसेल वाटलं नव्हतं.
पुढचे दोन तीन दिवस गेले अजूनही दुःख ओसरलं नव्हतं. नेता घराच्या बाहेर ओट्यावर शांत बसला होता. जवळचा सहकारी कानापाशी येऊन बोलला, “साहेब अजून काहीच तयारी नाही चार दिवसावर ऊस परिषद आहे. यावर्षी कॅन्सल करू हि परिषद” हे ऐकून नेता एकदम गंभीरतेने आपल्या सहकाऱ्याकडे पाहू लागला आणि बोलला, “हि परिषद होणारच”
ही परिषद होणारच. माझ्या वैयक्तिक दुःखापेक्षा सामाजिक कर्तव्य मोठं आहे
“पण साहेब …” तो सहकारी मधेच बोलणार असताना त्या नेत्याने हात करून थांबवलं. नेत्याच्या लक्षात आलं. नेता म्हणाला, “ही परिषद होणारच. माझ्या वैयक्तिक दुःखापेक्षा सामाजिक कर्तव्य मोठं आहे.” ऊस परिषदेचा दिवस आला. आठ दिवसापूर्वी सख्खा भाऊ गेल्याच दुःख ओसरलेलं नसताना लाखो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हा नेता हिम्मतीने सभेला संबोधून बोलायला लागतो. या नेत्याचा एकेक शब्द म्हणजे प्रत्येक शेतकरयाला खात्री होती त्यांच्या प्रश्नाला हाच माणूस न्याय देऊ शकतो. प्रस्थापितांच्या दळभद्री राजकारणाला हाच नेता वठणीवर आणू शकतो. ही परिषद म्हणजे प्रस्थापितांना धसका होता तर सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी एक विश्वास होता. आज ही ऊस परिषद म्हणजे महाराष्ट्रातील कित्येक शेतकऱ्यांसाठी एक सण आहे. लाखो शेतकरी दरवर्षी यासाठी महाराष्ट्रातून जयसिंगपूर इथे जमतात. जयसिंगपूर आज ज्या ज्या गोष्टींसाठी ओळखलं जातं, त्यात ऊस परिषदेचं नाव घ्यावंच लागेल. एखाद्याला काल्पनिक वाटेल अशी गोष्ट ज्या नेत्याने वास्तवात आणली तो नेता म्हणजे आदरणीय राजू शेट्टी साहेब.
त्यांच्या कार्यशैलीवर काहींचा आक्षेप असू शकतो
राजू शेट्टी आणि स्वाभिमानी संघटना यांच्याबद्दल आपले काही राजकीय किंवा सामाजिक मतभेद असू शकतील. त्यांच्या कार्यशैलीवर काहींचा आक्षेप असू शकतो. पण राजू शेट्टींच्या संघर्षाबद्दल मतभेद असणं म्हणजे येणाऱ्या पिढीचा प्रामाणिकपणावर विश्वास राहणार नाही. सर्वसामान्य माणूस सामाजिक आणि राजकीय पटलावर यशस्वी होऊ शकतो. हा विश्वास आताच्या काळात कोण देऊ शकतो तर ते म्हणजे राजू शेट्टी. स्वतःला राजकीय पार्श्वभूमी नाही, पैसा ओतून निवडून यावं अशी परिस्थिती नाही. त्यांच्या आयुष्यात तसा कोणी गॉडफादर नाही. तरीही हा माणूस ज़िल्हा परिषद सदस्य होतो, आमदार होतो आणि खासदार पण होतो.
हा संघर्ष ऐकायला वाटतो तितका सोपा नाही
कित्येक पिढ्यांपासून प्रस्थापित मंडळी सत्तेवर तळ ठोकून असतात. अशा वेळी या लोकांना एखादा प्रतिस्पर्धी आलाच तर प्रचंड असुरक्षित वाटतं. अशा वातावरणात राजू शेट्टींसाठी हा संघर्ष सोपा नव्हता. राजू शेट्टींना वाढता पाठिंबा पाहून प्रस्थिपितांनी त्यांना संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला . इथे लक्षात घ्या फक्त टीका करून किंवा आरोप करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला असं नाही तर त्याना जीवे मारण्याचा दोन तीन वेळा प्रयत्न झाला. आंदोलन चालू असताना राजू शेट्टींना फसवून अशा ठिकाणी आणलं जातं आणि गाव गुंडांकडून त्यांच्यावर हल्ला केला जातो. त्यांच्या डोक्याला जबर मार लागतो. रस्त्याच्या कडेला रक्तात भिजलेलं त्यांचा शरीर सुन्न पडलेलं होतं. त्यात दुर्दैव, मारहाणीत चेहऱयावर टी शर्ट आडवा आल्याने लोकांना त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता. अपघाताचा प्रसंग समजून ज्यांनी पहिला ते लांबूनच निघून गेले.
बेशुद्ध आणि जखमी राजू शेट्टींना लवकर मदत मिळाली नाही
त्यानंतर काही मजुरांनी राजू शेट्टींना रक्ताच्या थोरोळ्यातच जीप मध्ये बसवून दवाखान्यात पाठवलं. पुढचे तीन दिवस त्यांना शुद्ध आली नाही. या नेत्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी दवाखान्याला भेटी दिल्या. शुद्धीवर आल्यावर राजू शेट्टींना त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या लोकांची चांगलीच जाण होती. पण म्हणून त्यांनी बरं झाल्यावर हल्ला करणाऱ्यांचा बदला घ्यावा असं त्यांनी काही केलं नाही. किंवा कार्यकर्त्याना तसा काही आदेश दिला नाही. पण ज्या आंदोलनामुळे लाखो शेतकऱ्यांना न्याय मिळणार ते आंदोलन दडपण्याचा काही शक्तींनी विरोध केला होता. त्या आंदोलनाला न्याय देऊन राजू शेट्टींनी त्यांच्यावरच्या हल्ल्याचं उत्तर दिलं.
“नेता हा नेहमी जेताच असतो त्याला वैयक्तिक दुःखात गुरफटण्याचा अधिकार नसतो.”
हे राजू शेट्टींचं वाक्य सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वानी नोंद करून ठेवावं असं आहे. राजू शेट्टींच्या नेतृत्वात स्वाभिमानी संघटना शेतकरयांमध्ये रुजली, वाढली आणि बघता बघता महाराष्ट्रभर पसरली. राजू शेट्टींची संघटना वाढली याला महत्वाचं कारण आहे त्यांची चळवळीबद्दलची एकनिष्ठ. राजू शेट्टींना मानणारा वर्ग हा कोणत्या एका जातीचा नाही. राजू शेट्टींना शेतकरी नेता म्हणून जरी मान्यता मिळाली असली तरी बिगर शेतकरी समुदाय सुद्धा त्यांच्या पाठीशी राहिला आहे. गरीब, दलित, सर्वसामान्य मजूर, ओबीसी सर्व जाती धर्म, गरीब श्रीमंत वर्ग या सर्वानी राजू शेट्टींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. म्हणून तर निवडणुकीचे डिपॉजिट भरायची सुद्धा ताकत नसणारे राजू शेट्टी देशाच्या सर्वोच्च सभागृहात सर्व सामान्यांचं प्रतिनिधित्व करू शकले. राजू शेट्टी साहेबानी आतापर्यंत ज्या निवडणुकांना लढवल्या, त्या सगळ्या ह्या अभ्यासाचा विषय आहे. राजू शेट्टी प्रचार करत असताना एक नोट आणि एक ओट ही त्यांची लोकांना मागणी असायची.
प्रत्येक निवडणुकीत लोक राजू शेट्टींना निवडून आणणं कर्तव्य मानतात.
आपल्या परीने शक्य होईल ती मदत करतात. निवडणुकीत लोकांना पैसे वाटावे लागतात हे सूत्र सर्वमान्य असताना राजू शेट्टींना मात्र लोक निवडणुकीसाठी पैसे देतात अशी परिस्थिती भारतातील बोटावर मोजता येईल एवढ्याच मतदारसंघात आहेत. विधान सभा निवडणुकीदरम्यान राजू शेट्टी प्रचार करत असताना बयाजी नावाचा माणूस त्यांच्यासोबत दिवसभर हलगी वाजवतो. रात्री दहा वाजता बयाजी राजू शेट्टींना त्याच्या घरी येण्यासाठी विनंती करतो. राजू शेट्टी गंमतीने म्हणतात, “मी नाही आलो तर.” तेव्हा बयाजी मोठ्या विश्वासाने म्हणतो. “तुम्ही माझ्या घरी येणार नाही असं होणारच नाही. राजू शेट्टी त्याच्या घरी जातात. दारातच बयाजीची बायको पंचारती घेऊन राजू शेट्टींना ओवळण्यासाठी उभी असते. बयाजीचा चेहरा देव घरी आल्यासारखा खुलतो. ओवाळून झाल्यावर बयाजीने भैरोबाचा अंगारा साहेबांना लावला.
साहेब तुमच्या कामासाठी एवढंच देऊ शकतो
खिशातून चुरगलेली एक दहा रुपयाची नोट राजू शेट्टींच्या हातात ठेवत बोलला, “साहेब तुमच्या कामासाठी एवढंच देऊ शकतो. आज दिवसभर काही कमाई झाली नाही. माझ्या कडून एवढचं गोड मानून घ्या” क्षणभरासाठी त्याची नोट त्याला परत द्यावी वाटली. पण त्या नोटेत त्याच्या भावना लपलेल्या होत्या. प्रस्थापित चौकट मोडून काढण्याच्या कामात समाजातील प्रत्येक घटक त्यांच्या सोबत आपापल्या परीने मदत करत होता. ही घटना बळ देणारी होती. आज ही बयाजी भेटेल तेव्हा राजू शेट्टींना भैरोबाचा अंगारा लावून हातावर दहा रुपयाची नोट ठेवतो. यावर राजू शेट्टी म्हणतात, “आम्हा दोघातला याचक कोण आणि दाता कोण हे कोडं अजूनही उलघडलं नाही.” गावकीच्या दबावाखाली घराण्यांवर नकली श्रद्धा सिद्ध करणारे कार्यकर्ते खूप भेटतील. पण घासातला घास आपल्या माणसाला प्रेमानी भरवणारी माणसं खूप कमी लोकांना मिळतात. त्या कमी लोकांमध्ये राजू शेट्टींचं नाव घ्यावं लागेल.
राजू शेट्टींशी जुळलेल्या माणसाचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त बळकट आहे.
कारण राजू शेट्टींनी सामाजिक दायित्व प्रामाणिकपणे पार पाडलं म्हणून लोकांनी आपल्या घरातल्या माणसासारखं राजू शेट्टींना मानलं. सामाजिक कर्तव्याला त्यांनी कधी पाठ दाखवली नाही. याची साक्ष आणि जाणीव राजू शेट्टींना छातीवरच्या स्वाभिमानी संघटनेचा लाल बिल्ला देत राहिला. विदेशी दौऱ्यात असताना इतर पक्षातले काही मंत्री राजू शेट्टींना बोलायचे, “इथं काय उपयोग या बिल्ल्याचा, आता काढून ठेवा.” तेव्हा राजू शेट्टी नकार द्यायचे. व्हिएतनाम मध्ये असताना एक तरुण राजू शेट्टींना भेटायला येतो. सोबत असणाऱ्या इतर कोणत्याच मंत्र्यांना हा तरुण बोलत नाही. पण राजू शेट्टींची बॅग उचलून त्यांना गाडी पर्यंत सोडतो. त्याला विचारल्यावर तो सांगतो कि “तुमच्या शर्ट वरचा बिल्ला बघून मी तुम्हाला भेटायला आलो. माझे वडील तुमचेच कार्यकर्ते आहेत.” हीच माणसं राजू शेट्टींची खरी संपत्ती आहे. त्यांच्या संघटनेत फक्त राजू शेट्टीच सर्वसामान्यांचे नेते म्हणून निवडून आले नाहीत तर कित्येक दलित, गरीब, वंचित समाजातील लोकसुद्धा मोठ्या मोठ्या पदांवर निवडून आले. म्हणून तर कापड दुकानदार सुद्धा स्वाभिमानीमुळे सभापती झाला. अशी बरीच उदाहरणे सांगता येतील. थोडक्यात त्यांचं आयुष्य मांडायचा प्रयत्न केलाय. पण त्यांच्या आयुष्यातले टप्पे अजून बारक्याव्याने समजून घ्याचे असतील तर शिवार ते संसद हे राजू शेट्टींचं पुस्तक नक्की वाचा.
हे खास आपल्यासाठी
‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ : संघर्ष करणाऱ्या सर्वानी वाचावे असे…
सचिन वाझे प्रकरणात शरद पवार ज्युलिओ रिबेइरो या अधिकाऱ्यामार्फत तपास करा असं का म्हणाले?
मुंबईच सुखाचं आयुष्य सोडून बिहारच्या खेड्यात या डॉक्टरने गरिबांची सेवा केली.