मुंबईच सुखाचं आयुष्य सोडून बिहारच्या खेड्यात या डॉक्टरने गरिबांची सेवा केली. तिनं जायचं ठरवलं. एवढं शिकली म्हणल्यावर आता कुठं पैसा कमवायची वेळ असताना हि डॉक्टरीन बाई एकदम बिहारला जायचं कसं काय ठरवते. मुंबई पुण्याला मस्त जगायचं. दर आठवड्यला पबला जावं. हे असलं सगळं सोडून ती म्हणते मी बिहारला जाणार. ते पण सरकारी दवाखान्यात काम करायला. अग बाई त्या बिहारला शहरात राहायची सोय नाही. तू खेड्यात जाऊन काय करणार. अजय देवगणचा गंगाजल बघितला हे आम्ही, काय गुणाचं आहे ते बिहार माहितीये. ही औदासा कुठून सुचली काय माहित आणि ती चंपारणला गेली, मोतीहारीला एका सरकारी दवाखान्यात काम करायला लागली. मुंबईत वाढलेली ही पोरगी काय टिकणार नाही तिथं.
ही वास्तविक कथा आहे एका छत्तीस वर्षीय स्त्री रोग तज्ञ् डॉ. तरु जिंदल यांची. ही गोष्ट पन्नास साठ वर्षांपूर्वीची अजिबात नाही, तर आताची गेल्या पाच-सहा वर्षातली ही सगळी घटना आहे. वयाच्या तिसाव्या वर्षी डॉ. तरु यांनी बिहार मधल्या सरकारी दवाखान्यातील डॉक्टर, नर्स, यांना प्रशिक्षण देण्याच्या हेतूने त्या मोतीहारी जिल्हा रुग्णालय इथे रुजू झाल्या. एका सामाजिक संस्थेचा हा उपक्रम होता जेणेकरून शासकीय आरोग्य व्यवस्था सुधारेल. पण कोणतीही सुधारणा आपल्या समाजात तेवढी सोपी नाही. सुखाचं आयुष्य सोडून तुम्ही सामाजिक काम करायला निघाला म्हणजे लोक हार घेऊन तुमच्या स्वागतासाठी तयार नसतात. त्यातही तुम्ही बिहार सारख्या ठिकाणी काम करायचा विचार करताय म्हणजे तर अजून अवघड. पण तरीही डॉ. तरूने बिहार निवडलं. कारण बिहार सारख्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था सुधारण्याची गरज जास्त आहे. शिवाय बिहारला जायची इतर डॉक्टरांची तयारी नाही. परिणामी बिहार अजूनही मूलभूत आरोग्य सुविधांपासून खूप लांब आहे. डॉ. तरु यांनी त्यांच्या पुस्तकात सविस्तर आकडेवारी मांडली आहे.
तारूण्याच्या जोशात बिहारला जायचं तर ठरवलं पण तिथला संघर्ष दिसतो तसा रोमँटिक नाही. सुरवात होते हॉस्पिटल पासून. हॉस्पिटलच्या बाहेर दहा पंधरा कुत्री घर करून आहेत. पान खाऊन सडा मारणारे दवाखान्याचा एकही कोपरा मोकळा सोडत नाही. ऑपरेशन थिएटर मध्ये चपला घालून येणं जाणं चालू आहे. रुग्णाचा तपास करण्यासाठी मूलभूत साहित्य नाही. कोणाला काही विचारल्यास एकमेकांवर ढकलणं. डॉक्टरांचं कधीही येणं-जाणं. अप्रशिक्षित नर्स. रुग्णाची असुरक्षित हाताळणी. हॉस्पिटलच्या सर्व स्टाफला मूलभूत प्रशिक्षण नाही.
आपत्कालीन परिस्थिती आल्यास रुग्णांना खाजगी दवाखान्यात पाठवणे. अशा परिस्थितीत काम करायचं आहे. ही परिस्थिती बघून कोणाला ही राग येईल पण या लोकांमध्ये राहून बदल करायचा आहे. बदल हा एका रात्रीत होणार नाही. या लोकांची बाजू ऐकून त्यांच्याशी एकरूप होणं गरजेचं आहे. हे डॉ. तरु यांनी समजून घेतलं. तुमच्या आमच्या सारखा अशा परिस्थितीत लगेच प्रतिक्रिया देऊन निघून गेला असता. डॉ. तरु यांनी मात्र खूप संयमाने परिस्थिती हाताळली. डॉ. तरु यांच्या जीवनावर गांधीजींचा खूप प्रभाव आहे हे त्यांनी आधीच सांगितलं आहे. पण त्यांच्या सगळ्या कृतींमधून गांधीं विचारांचा वास्तवात त्यांनी अवलंब केला आहे, हे दिसून येतं.
ज्या तरुणांना काहीतरी सामाजिक काम करायचं आहे. त्यांनी डॉ. तरु यांच्या या अनुभवाचा संदर्भ घेत फायदा करून घेतला पाहिजे. सुरवातीला happening किंवा रोमॅंटिक वाटणारी कोणतीही सामाजिक कृती करताना अशा बऱ्याच घडामोडी होतात ज्यासाठी आपण तयार नसतो. काही वेळा असे प्रसंग ओढवतात कि ज्यामुळे एकदम निराशा येते. तेव्हा हे सामाजिक काम सोडून द्यावं, एवढाच पर्याय उरतो. डॉ. तरु जिंदल यांच्या सामाजिक कार्यात पण हे प्रसंग बऱ्याच वेळा आले. एका प्रसंग आवर्जून नमूद करावा वाटतो. डॉ. तरु यांनी मसारही इथे महिलेची प्रसूती करत असताना अतिशय गंभीर परिस्थिती उदभवली. थोडा हलगर्जीपणा सुद्धा जीवावर बेतला असता. आई आणि बाळ दोघांच्या जीवाला धोका असताना त्यांनी मोठ्या कष्टाने त्यांनी दोघांना वाचवलं. ऑपरेशन दरम्यान तरु यांच्या हातात चिमटा होता ते कोणीतरी पाहिलं आणि गावात अफवा पसरली, “मुंबईवाली मॅडमने बच्चे का सर फोड दिया”. या प्रसंगामुळे डॉ. तरु यांना खूप वाईट वाटलं. या अफवेमुळं त्यांच्या दवाखान्यात लोक येणं कमी झाले. पण तरीही डॉ. तरु यांनी लोकांना दोष देत कामातून पळ काढला नाही. डॉ तरु प्रामाणिकपणे आपलं काम करत राहिल्या.
डॉ. तरु जिंदल यांनी बिहार मध्ये केलेल्या या कामाचा परिणाम दीर्घकाळ आहे. दुर्दैवाने डॉ. तरु यांच्या आयुष्यात असं वळण आलं ज्यामुळे त्यांना दीर्घकाळ बिहार मध्ये राहता आलं नाही. हे वळण कोणतं होतं यावर बोलणार नाही. पण डॉ तरु जिंदल यांच्या कामाचं श्रेय मात्र त्यांना दिलं पाहिजे. आणि त्यांचं हे काम अधिक विस्तृतपणे समजून घेण्यासाठी A Doctor’s Experiment in Bihar हे पुस्तक नक्की वाचा. मराठीत सुद्धा हे पुस्तक आलं आहे.
हे खास आपल्यासाठी
‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ : संघर्ष करणाऱ्या सर्वानी वाचावे असे…
सचिन वाझे प्रकरणात शरद पवार ज्युलिओ रिबेइरो या अधिकाऱ्यामार्फत तपास करा असं का म्हणाले?
अर्थाच्या शोधात – डॉ. विजया बापट